!['राष्ट्रीय महामार्गाचं काम आमच्यावर सोडा...' सुजय विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला rohit pawar07](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/rohit-pawar07-780x470.jpg)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला पहायला मिळतात. तर आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर देखील टीका केली आहे. सुजय विखे पाटील म्हणाले की, कर्जत-जामखेड तालुक्यातील एक ही सरकारी अधिकारी हसताना दिसंत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असतं. या तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीए च जास्त आहेत असा टोला विखे पाटील यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
याचप्रमाणे त्यांनी कर्जत तालुक्यात अधिकाऱ्यांवर आमदारांकडून दबाव असल्याचा ही गंभीर आरोप केला. तसंच आमदार हे फक्त नारळ फोडायल येतात. कर्जतमधील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाचे उद्घाटन मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कामाची मंजुरी माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली होती. त्यासाठी लागणारा निधीही त्यांनीच मंजूर करून आणला होता. तसंच त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला कि, मिरजगावमधील रस्त्याची दुरवस्था बघा. राष्ट्रीय महामार्गाचं काम आमच्यावर सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता पूर्ण करा.