महाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

विधान परिषदेत कोण ठरणार बळीचा बकरा?

मुंबई Legislative Council Election | विधान परिषद निवडणुकीत अकरावा बळीचा बकरा कोण असणार? अर्थात अकरावी ‘विकेट’ कुणाची? राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. कारण विधान परिषदेच्या दहा जागांसाठी राज्यात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कुणाचा कार्यक्रम करणार, याचीच चर्चा रंगली आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीची दहा मते फुटल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्यातच आता विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात अकरा उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावधगिरीने मतदान अपक्षांचे
जर अपक्ष आमदाराने आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवले तर ते मत बाद ठरवले जाते. मात्र विधान परिषद निवडणुकीत विविध राजकीय पक्षांना, तसेच अपक्षांनाही गुप्त मतदान करावे लागते, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतफुटीची शक्यता जास्त असते. तर या निवडणुकीत कुणाचं मत फुटलं तेसुद्धा समजणार नसल्याने पक्षाकडून अपात्रतेची कारवाई करण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता नसते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक पक्ष सावधगिरी बाळगतो.

राज्यात राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. त्यातच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. मात्र काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. दहा दिवसांत ही दुसरी निवडणूक असल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीचा परिणाम राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीपूर्वी भाजपकडे अपेक्षित संख्याबळ नव्हते. मात्र बेरजेचे राजकारण करीत भाजपने या निवडणुकीत बाजी मारली. त्यामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्षांची मते फुटली. त्यापाठोपाठ आता विधान परिषद निवडणूक होणार असल्याने महाविकास आघाडीची मतं पुन्हा फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येते.

भाजपकडून राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड असे चार उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, आमशा पाडवी उमेदवार आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर, चंद्रकांत हंडोरे, तर काँग्रेसकडून भाई जगताप मैदानात आहेत. भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहता भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र भाजपने पाचवी, तर काँग्रेसने दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठीही विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचे १०६, राष्ट्रवादीचे ५३ आणि शिवसेनेचे ५६ (आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे.) तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.

मात्र राज्यात अपक्ष आणि विविध छोट्या पक्षांचे २९ इतके संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागा अधिक १ असे समीकरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत पराजय नक्की कोणाच्या वाट्याला येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये