राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

देवा तूचि गणेशु…

-बाळासाहेब बडवे

संपूर्ण विश्व दु:खाने जसे भरभरून ओतप्रोत वाहत असते, तसेच सुखानेही त्याला सातत्याने न्हाऊ घातले जाते. जीवनाची प्रेरणा ही सत्कर्मात आहे, का दुष्कर्मात आहे या गणिताच्या उत्तरावर सुख-दु:खाच्या कल्पना अवलंबून असतात आणि म्हणूनच जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटावर मात करता यावी म्हणून पुराणकाळापासून श्री गणेश उपासनेला विशेष महत्त्व दिलेले आहे. विशेषत: श्री गणेश पुराणात या संदर्भातील अत्यंत सखोल असे आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर आधारलेले विवेचन आपल्याला पाहवयास मिळते. श्री गणेश हा व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला नव्हे, तर संपूर्ण विश्वाला सकारात्मकतेची दृष्टी देणारी अधिष्ठित देवता मानली जाते.

श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतात घरोघरी, इतकेच नव्हे, तर परराष्ट्रांत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या घरी श्री गणेशाची येणार्‍या उपासना केली जाते. प्रारंभी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन कौटुंबिक किंवा सार्वजनिकरीत्या केले जाते. श्री गणेशोत्सव हा सार्वजनिक करण्यामागे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची एक वेगळी संकल्पना होती. पारतंत्र्यात जखडून गेलेल्या भारतीय जनतेचे संघटन करून स्वातंत्र्याची पेटलेली ज्योत अधिक प्रभावी करण्याचे एक माध्यम म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेला टिळकांनी जन्म दिला. त्याचा परिणामही सकारात्मक झाला. त्या पाठीमागची राष्ट्रीय भावना ही अधिक दृढ होत गेली आणि लोकमान्यांच्या हेतूला सकारात्मक परिणती प्राप्त झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रात, तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये श्री गणपती उत्सवाचा सार्वजनिकदृष्ट्या एक वेगळा आविष्कार दिसून येतो.

श्री गणेशाच्या उपासनेच्या दृष्टीने अनेक संकल्पना शास्त्राने विदित केलेल्या आहेत. उपासनेचे अनेक प्रकार धर्मशास्त्राने आणि पौराणिक वाङ्मयाने मार्गदर्शित केलेले आहेत. हा उपासनेचा एक प्रकारचा यज्ञच मानला, तर ते अधिक सयुक्तिक होईल असे वाटते. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. ज्ञानाच्या अभिरुचीचे उगमस्थान श्री गणपती आहे असे मानले गेले आहे. भगवान व्यासांनी श्री गणेशाकडून १२ स्कंधांचे भागवत पुराण लिहून घेतले. त्यात दोघांच्याही काही अटी-शर्ती होत्या. पण यातून परमेश्वराविषयीचे एक तत्त्वज्ञान श्रीमद् भागवताच्या निमित्ताने पुढे आले. ते अजरामर ठरले गेले. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी भावार्थदीपिकेत पहिल्या अध्यायात श्री गणेशाचे वर्णन करताना गणेशा, तू बुद्धीची देवता आहेस…


देवा तूचि गणेशु। सकळमतिप्रकाशु।
म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी।

हे गणेशा, तू बुद्धीला प्रकाश देणारी देवता आहेस. तुझ्या उपासकांचे मंगल आणि मांगल्य उपासनेच्या गूढ तत्त्वात गुंतलेले आहे. हा निवृत्ती महाराजांचा शिष्य तुला प्रार्थना करतो. हा ज्ञानयज्ञ मी चालवलेला आहे, त्या ज्ञानयज्ञाला तू आशीर्वाद प्रदान कर. साधारणपणे ज्ञानेश्वर महाराजांची ही त्यामागची संकल्पना आहे. तो संकटविमोचक आहे, तो संकट हरण करणारा आहे, तो संकटातून मार्ग दाखवणारा आहे आणि इतकेच नव्हे तर संकटातून पार करणाराही तोच आहे. म्हणून प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी श्री गणेश पूजनाचे माहात्म्य सांगितलेले आहे.

गणेशाचा नामजप हासुद्धा शास्त्राने एक यज्ञ मानलेला आहे. चौथ्या अध्यायात २४ व्या श्लोकापासून ३० व्या श्लोकापर्यंत श्रीमद् भगवद्‌गीतेत यज्ञाचे १२ प्रकार सांगितलेले आहेत. ब्रह्मयज्ञ, भगवर्पणरूपी यज्ञ, अभिन्नतारूपी यज्ञ, कर्तव्यकर्मुरूपी यज्ञ, संयमरूपी यज्ञ, विषयहवनरूपी यज्ञ, समाधिरूपी यज्ञ, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ, प्राणायामरूपी यज्ञ, स्तम्भवृत्ति (चतुर्थ प्राणायामरूपी) यज्ञ असे यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत. हा यज्ञ व्यष्ठी आणि समष्ठी यांच्याशीसुद्धा निगडित आहे आणि म्हणून गणेश उपासनेला एक यज्ञ मानले गेले, तर चुकीचे ठरणार नाही.

श्री गणेशजन्माची कथासुद्धा तितकीच विलक्षण आणि कौटुंबिक व्यवस्थेला एक वेगळे मार्गदर्शन करणारी आहे. माता पार्वती स्नानाला गेली आणि जाताना तिने गुहेबाहेर गणेशाला उभे करून सांगून ठेवले होते, की कुणीही आले तरी आत सोडायचे नाही. मी स्नान होईस्तोवर ही दक्षता तू घे. साक्षात पिताश्री भगवान शंकर आले. त्यांना गणेशाने पार्वतीमातेच्या स्नानक्रियेत बाधा येईल म्हणून आपण आत प्रवेश करू नका, असे स्पष्टपणे बजावले. मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून पुत्रकर्तव्य किती निष्ठुरपणे आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडले, हा एक सामाजिक संदेश या कथेतून आपल्याला मिळतो.

भगवान शंकरांनी त्याचे मस्तक उडविले, माता पार्वतीने आग्रह धरल्याने गजराजाचे मस्तक आणून त्याला बसवले आणि गेल्या हजारो वर्षांपासून सोंड असलेल्या श्री गणरायाचे पूजन आपण करत आलो आहोत. आता याला फक्त कौटुंबिक स्वरूप उरले नसून, एक सामाजिक स्वरूप उत्सवाला प्राप्त झाले आहे. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी श्री गणपतीला ‘देवा तूचि गणेशु’ असे संबोधन केले आहे. आपल्या समाजाला, कुटुंबाला, राष्ट्राला आणि संपूर्ण विश्वाला आवश्यक असणारी जीवन जगण्याची ऊर्जा प्राप्त होवो, अशी प्रार्थना या निमित्ताने श्री गणेशाला आपण करूया.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये