मॅरेथॉन नव्हे ‘ पावनखिंड रन ‘
इतिहासाची ओळख रुजविण्याचा अफलातून प्रयोग
अनिरुद्ध बडवे,
संपादक , राष्ट्रसंचार
मॅरेथॉन या पठारावरून फेडापेद्दीस नावाचा सैनिक अथेन्स पर्यंत पळाला आणि त्याने विजयाचा सांगावा दिला. त्याच्या त्या धावण्यामुळे आपल्याकडे मॅरेथॉन हा शब्द प्रचलित झाला. परंतु रिकाम्या हाती २५ किलोमीटर पळालेल्या फेडापेद्दीस पेक्षा पावनखिंड ते पन्हाळा असा ५२ किलोमीटर सशस्त्र मावळा पळाला, तो देखील संघर्ष करत करत. हा देखील धावण्याचा एक विक्रम होता. त्यामुळे मॅरेथॉन ऐवजी पावनखिंड रन हा शब्द प्रयोग प्रचलित करण्यासाठी ‘माढा डॉक्टर असोसिएशन’ची एक अनोखी चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भल्या पहाटे या ‘पावनखिंड रन’ चे योजन होते. राष्ट्र संचार गेल्या दोन वर्षांपासून याचा माध्यम प्रयोजक आहे.
‘माढा तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन’ ने गेल्या काही महिन्यांपासून ‘पावनखिंड रन’ नावाचा नवीन धावण्याचा इव्हेंट आयोजित केला आहे. यावर्षी देखील हा उपक्रम सुरू आहे.
सध्या प्रचलित शब्दानुसार याला ‘मॅरेथॉन’ म्हणतात. ‘मॅरेथॉन’ म्हटलं की लोकांच्या लगेच लक्षात येतं. कारण तो शब्द आपण प्रचलित केला आहे. परंतु या पावनखिंड रनसाठी ‘मॅरेथॉन’ हा शब्द मुद्दामच न वापरता त्याला ‘पावनखिंड रन’ असे संबोधन गेल्या अनेक वर्षापासून विस्मृतीत केलेला इतिहास रुजविण्याचा प्रयत्न करण्याचा एक स्तुत्य उपक्रम डॉक्टर मंडळींकडून होत आहे.
सोलापूर पुणे हायवे वर टेंभुर्णी बायपासच्या जवळ प्रतिवर्षी हा कार्यक्रम आयोजित होतो. शेकडो डॉक्टर आणि माढा तालुक्यातील नागरिक यामध्ये उस्फूर्तपणे सहभागी होतात.
हल्ली गल्लोगल्ली मॅरेथॉनचे पीक आलेली दिसते. जो तो मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपलं विक्रम दर्शवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मॅरेथॉन म्हणजे तरी काय ? तर या शब्दामागे देखील एक इतिहास आहे. प्राचीन काळी ग्रीस देशांमध्ये मॅरेथॉन नावाचे पठार होते. तिथे एक लढाई जिंकल्यावर ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२ किलोमीटर होते. ज्या गावी ही लढाई झाली त्या गावाचे नाव “मॅरेथॉन ” होते त्यावरून या क्रीडा प्रकाराला मॅरेथॉन हे नाव पडले. जे अंतर तो सैनिक पळाला तेच अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या जगभर स्वीकारले गेले. दुर्दैवानं अतिश्रम होऊन तो पोहोचतात विजयाचा निरोप देऊन मरण पावला .या सैनिकाचे नाव फेडापेद्दीस. याची दौड अजरामर झाली.
परंतु मराठमोळ्या मॅरेथॉनचाही एक मोठा इतिहास आहे.
महाराष्ट्राच्या पावनखिंड या अभूतपूर्व प्रसंगाला स्मरून ‘डॉक्टर असोसिएशन’ याला एक वेगळे नाव दिले, पावनखिंड रन ! फेडापेद्दीस ज्याप्रमाणे अथेन्स पर्यंत पळाला, त्याचप्रमाणे शिवरायांचे मावळे देखील विजयासाठीची लढाई करत आणि विजयाचा सांगावा प्रत्यक्षात आणण्यासाठी धावले. आषाढी पौर्णिमेला गुरुवार १२ जुलै १६६० च्या पावसाळी रात्री पन्हाळा ते पावनखिंड व पुढे विशालगड हातात शस्त्र आणि पाठीवर शत्रू घेऊन मुसळधार पावसात दगड, धोंडे तुडवत पळाले. ऊर फुटेस्तोवर शिवरायांचे मावळे पळाले. बाजीप्रभू देशपांडे यांनी पराक्रमाची शर्थ केली. राजे गडावर पोहोचले तोफांचा आवाज झाला आणि बाजीप्रभू धारातीर्थी पडले . हा इतिहास सर्वांनाच माहित आहे…..
हे अंतर होते तब्बल ५२ किलोमीटर आणि लढले त्या बलाढ्य शत्रूशी या पावनखिंडीच्या धावत्या लढाईची स्मृती म्हणून ‘पावनखिंड रन’. आपला एवढा मोठा जाज्वल्य इतिहास असताना आपण लोकांचा इतिहास का स्वीकारायचा ? त्यामुळे हे बदला. सर्वांनी मॅरेथॉन नव्हे ‘पावनखिंड रन’ म्हणा हा संदेश या निमित्ताने दिला जातो … त्याप्रमाणे अथेन्स पर्यंतचे अंतर २५ किलोमीटर होते त्यामुळे जगभरात मॅरेथॉनचा परी धावण्याचा मापदंड हा २५ किलोमीटर ठेवला जातो. परंतु पावनखिंड पर्यंत मावळे ५२ km धावले. आपण याचे परिमाण ५२ किलोमीटर निश्चित ठेवूया. २५ किलोमीटरची करायचे असेल तर फार तर अर्धी पावनखिंड म्हणू या. त्यामुळे आता मॅरेथॉनमध्ये पळालो नाही तर पावनखिंडमध्ये धावलो असा शब्द प्रयोग वाक्य प्रयोग आपल्याला प्रचलित करायचा आहे हा अनोखा संदेश डॉक्टर असोसिएशनने दिला आहे. इतिहासाची संस्कृतीची आणि शौर्याची ही ओळख रुजविण्यासाठी दरवर्षी येथे पावनखिंड रन आयोजित केली जाते.
दैनिक राष्ट्र संचार हा या ‘ पावनखिंड रन ‘ उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. गेल्या दोन वर्षापासून राष्ट्र संचार सहभागाने ही स्पर्धा प्रायोजित होते. याचा आम्हा वृत्तपत्रसमूहाला देखील यथोचित अभिमान आहे. मॅरेथॉन ऐवजी पावनखिंड हा शब्द प्रयोग वापरण्याच्या मोहिमेमध्ये आपण सर्व सहभागी होऊयात !