सक्सेस स्टोरी

महाबालनाट्य ‘राजा सिंह’

माणसाचाही रोबोट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिवसेंदिवस मंदावत चाललेली बालनाट्य चळवळ पुन्हा एकदा कात टाकून ताजीतवानी होऊ पाहतेय. त्यात आजच्या अहन् क्रिएशन्स, रत्नागिरी या संस्थेचा खारीचा वाटा आहे. लहानांच्या छोट्या-मोठ्या गोष्टी, प्राणी, पक्षी, पर्‍या, जादूगार, राजकुमार-राजकुमारी, चेटकीण, राक्षस अशी सगळी पात्र अगदी विदूषकसुद्धा कुठे आणि कधी गायब झाली कळलंच नाही. यांची जागा खूप अवघड अन् अवजड विषयांनी घेतली आहे.

मुलांच्या वयाला, त्यांच्या बालमनाला त्याचं ओझं व्हावं असे हे विषय. जसे ‘लेक वाचवा-लेक शिकवा, स्त्रीभ्रूण हत्या, मुलगा-मुलगी एकसमान, हुंडाबळी इ. अनेक विषय जे समाजप्रबोधनासाठी आवश्यक तर आहेत, पण त्यासाठी जे माध्यम निवडलं जातंय ते खरोखरच आक्षेपार्ह आहे असं वाटतं. बालपण हल्ली हरवूनच जातंय. एकतर शाळा, शिकवण्या, जास्तीत जास्त नव्हे तर पैकीच्या पैकी मार्क मिळविण्याची स्पर्धा ही तर मुलांना मार्कार्ंथी बनविते आहे. विद्यार्थीपण यातच हरवतंय. मनोरंजन-करमणूक ही या बालगोपाळांची खूप महत्त्वाची अशी मानसिक गरज आहे. याचा शिक्षकांसह पालकांनाही विसर पडू लागला आहे. बैठे खेळ, मैदानी खेळ तर जवळजवळ लुप्तच होत आहेत. संगणक, मोबाईल, टी. व्ही. यांचं या खेळाच्या आणि मनोरंजनाच्या वेळांवरच चक्क अतिक्रमण होत आहे.

या सगळ्यातूनच त्यांना अर्थात आपल्या बालगोपाळांना पुन्हा एकदा खर्‍या बालपणाकडे घेऊन जायची वेळ आली आहे. म्हणूनच निसर्ग, पक्षी, प्राणी यांच्या सहवासात जाऊन त्यांच्याशी संवाद साधताना छोटे छोटे सोप्या भाषेतले संदेश देत देत मनोरंजन करायचा हा अहन थिएटर्सने या भव्य-दिव्य ‘राजा सिंह’ या महाबालनाट्याच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न आपणा सर्वांच्या साथीनेच यशस्वी होईल अशी खात्री वाटते. ‘राजा सिंह’ हे बालनाट्य आपल्या रसिक प्रेक्षकांना जंगल सफरीचा अनुभव देऊन जाते. आजीच्या गोष्टींची आठवण करून देते. जंगल, प्राणी, राक्षस, तपस्या, वर, चमत्कार या सार्‍यांचा एक आगळावेगळा अनुभव हे नाटक पाहताना येतो. ‘राजा सिंह’ ही गोष्ट आहे चांगल्या विरुद्ध वाईट प्रवृत्तीची, एकीची, मैत्रीची, धाडसाची, शौर्याची! ‘राजा सिंह’ ही गोष्ट आहे विक्रमसिंहाची, वानरसेनेची, सशांची, आजीची, चांडाळ सिंहाची, मुंग्यांची, हरणांची, गेंड्याची, बैल, हत्तींची.

अहन् थिएटर्स सादर करीत आहे, पूजा संदीप बावडेकर निर्मित धमाल, संगीत, नृत्याभिनयाने परिपूर्ण महाबालनाट्य ‘राजा सिंह’. कोकणात २५ वर्षांनंतर अशा बालनाट्याची निर्मिती झाली आहे. हे पहिलेच बालनाट्य ठरले आहे आणि आता पुन्हा नव्या जोमाने पुण्यातून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. अहन थिएटर्सच्या ‘चला नाटक खेळूया’ या अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून सिने-नाटकात व मालिकांमध्ये सुपरिचित असलेला अभिनेता केतन क्षीरसागर यांच्या दिग्दर्शनाखाली, विवेक साठे यांनी लिहिलेल्या या संहितेत रत्नागिरी जिल्ह्यातील बालकलाकारांनी धम्माल आणि कमाल रंग भरलेत. १४ बहारदार नृत्यांनी याची रंगत आणखीनच वाढवली आहे. या नृत्याला मोहक साज मजेशीररीत्या चढवलाय तो नृत्यदिग्दर्शक सिद्धेश दळवी यांनी. १७ गाण्यांचे गीतकार आहेत तेजस रानडे, केतन क्षीरसागर, विवेक साठे आणि शशिकला ओक.

खरंतर काहीतरी वेगळं आणि भव्य निर्माण होणार आहे याची मला खात्री होती. नाटक करण्याचं ठरलं आणि मी तेव्हापासूनच नाटकाशी जोडला गेलो. या सुंदर कलाकृतीशी मी जोडला गेलो आहे या गोष्टीचा मला नक्कीच आनंद आहे. याचे हजार प्रयोग तरी व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
अजिंक्य जोशी, विशेष मार्गदर्शक- राजा सिंह

राजा सिंह सारखं भव्य नाटक दिग्दर्शित करणं हे माझ्यासाठी खरंतर एक आवाहन होतं. ४३ बाल युवा कलाकारांच्या संचात सुरुवातीचे काही प्रयोग केले. अगदी साडेपाच वर्षांच्या मुलांपासून ते तीस वर्षांच्या मोठ्या कलाकारांचा त्यात समावेश होता. राजा सिंह हे नाटक करायचं ठरलं तेव्हाच ते हटके करण्याचं मी ठरवलं होतं. संगीत नृत्य अभिनयाने परिपूर्ण असं हे नाटक त्यात एक दोन नाही तर तब्बल सतरा गाणी, प्रत्येक गाण्यावर उत्कृष्ट अशी कोरिओग्राफी. नाटकाचं नृत्य दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सिद्धेश दळवी यांनी केले तर संगीतकार म्हणून मयूरेश माडगावकर यांनी सगळ्या गाण्यांना उत्तम चाली लावल्या. गीते तेजस रानडे, विवेक साठे, शशिकला ओक आणि मी स्वतः लिहिली आहेत. नाटक उत्तम झालं, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सगळ्यात आनंदाचा क्षण तेव्हा होता जेव्हा नाटकाची निवड जश्ने ए बचपन या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात झाली. त्या वर्षी तिथे निवड झालेलं राजा सिंह हे एकमेव मराठी बालनाट्य होतं. आता त्याचे खूप प्रयोग व्हावेत आणि रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा हीच इच्छा आहे.

केतन क्षीरसागर, दिग्दर्शक – राजा सिंह

राजा सिंह या महाबालनाट्याची निर्मिती करणं हे माझ्यासाठी तरी शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. केवळ बालरंगभूमीसाठी आपलं काहीतरी योगदान असावं आणि मुलांना चांगलं दर्जेदार नाटक बघायला मिळावं या हेतूने मी राजा सिंहची निर्मिती केली. आधी रत्नागिरीतून तिथल्या बाल युवा कलाकारांना घेऊन या नाटकाचे प्रयोग केले. आता नव्या-जुन्या संचात पुण्यातील कलाकारांना घेऊन याचे प्रयोग सुरू आहेत. उत्तम निर्मितीमूल्य असलेलं राजा सिंह बाल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेच, सोबत मोठे रसिक प्रेक्षकदेखील त्याचं कौतुक करताहेत. हे नाटक सगळ्यांनीच बघावे अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत आम्ही मुंबई, पुणे, गोवा, इंदोर आणि दिल्लीला प्रयोग केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या नाटकाचे प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.

सौ. पूजा संदीप बावडेकर, निर्माती – राजा सिंह

या गीतांना सुमधुर संगीत दिलंय तरुण तडफदार मयूरेश माडगावकर यांनी. या सुंदर संगीतबद्ध झालेल्या गाण्यांना स्वरराज चढवलाय आमच्या शास्त्रोक्त संगीत शिकणार्‍या १४ बाल व युवा गायकांनी आणि विशेष म्हणजे यांच्या सुरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक हृषिकेश रानडे यांनीही सूर मिसळलेत. इतकेच काय प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर, अजिंक्य जोशी यांचे सूरही आपण ऐकणार आहोत. फक्त मज्जाच नाही तर जंगल राखा, पर्यावरण जोपासा, पाणी जपून वापरा, स्वच्छता राखा असे अनेक महत्त्वाचे संदेश आपल्याला ‘राजा सिंह’ देणार आहे. चला तर मग अडीच तास धमाल-कमाल प्रत्यक्ष अनुभवायला ‘राजा सिंह’ पाहायला येताय ना? हे महाबालनाट्य नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास केतन क्षीरसागर यांनी दै. ‘राष्ट्रसंचार’शी बोलताना स्पष्ट केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये