“फडणवीस : फोर्स & फायनान्स”; भाजपचा वरचष्मा असलेले खातेवाटप

मुंबई – Maharashtra Cabinet : मुख्यमंत्रिपद जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी महाराष्ट्रावर देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा आहे, हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत भाजप शिंदे गट सरकारने आज खातेवाटप जाहीर केले. यामध्ये दोन मुख्य खाती असलेल्या फोर्स अँड फायनान्स म्हणजे गृह विभाग आणि वित्त व नियोजन विभाग हे देवेंद्र फडणवीस यांच्या भात्यात गेले आहेत, तर जलसंपदा, ऊर्जा, गृहनिर्माण यांसारख्या तब्बल पाच महत्त्वाच्या खात्यांवरही फडणवीस यांचा थेट वरचष्मा असेल, तर त्यांचे जवळचे समजले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडेदेखील महत्त्वपूर्ण अशा ग्रामविकास, युवक कल्याण आणि वैद्यकीयचा अधिकार देण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांकडे मृदा जलसंधारण परिवहन अशी खाती असली तरी देवेंद्र फडणवीस हेच प्रथम क्रमांकाचे लीडर आहेत, असे स्पष्ट संकेत देण्याचा प्रयत्न या खातेवाटपातून झालेला आहे.
चंद्रकांत पाटील यांची बोळवण
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलेले खाते मात्र तुलनेने दुय्यम मानले जाते. त्यांना सार्वजनिक बांधकाम किंवा महसूल विभाग मिळेल, असे मानले जात असताना थेट उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग या विभागांवर त्यांची बोळवण करण्यात आल्याचे दिसते.
प्रथम पाच खाती
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे खाते दिल्यानंतर त्याच्याखालोखाल भाजपमधील राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आणि विजयकुमार गावित, तसेच गिरीश महाजन यांचा क्रमांक लागत आहे. चंद्रकांत पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
नव्याने आलेल्यांना मोल
राधाकृष्ण विखे-पाटील गावित यांच्यासारख्या मंत्र्यांना महत्त्वपूर्ण खाती देण्यात आली आहेत. महसूलसारखे महत्त्वपूर्ण खाते विखे-पाटील देत असताना बाहेरून आलेल्या नेतृत्वांचा भाजप किंवा हा सरकार सन्मान करते, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांना प्रमुख पद देण्यात आले असले तरीदेखील मागच्या वेळी अर्थमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांना वने व सांस्कृतिक विभागाचा पदभार घेऊन थोडेसे डीव्हॅल्यूएशन केल्याचाच प्रकार झाला आहे. त्यांची शंभर कोटी वृक्षलागवड योजना वादात सापडल्यामुळे त्यांना ही घसरण सहन करावी लागत असल्याचे समजते, तसेच चंद्रकांत पाटील यांच्यादेखील मागील कारकिर्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे क्रमवारी घसरली. भाजपचे चिन्ह यंदा पुन्हा ते घोळ नकोत, या हेतूने पाटील यांच्याकडे ते खाते दिले नसल्याचे दिसते. विजयकुमार गावित यांना मात्र अपेक्षेप्रमाणेच आदिवासी विकास हे खाते देण्यात आले आहे. त्याकरिताच त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लावण्यात आली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेले गिरीश महाजन यांना शिक्षकांच्या बदल्या, तसेच ओबीसीचे प्रश्न याबाबत महत्त्वपूर्ण असे जिल्हा परिषदांचा कारभार सांभाळण्याबाबतचे मुख्य खाते देण्यात आले आहेत. ग्रामविकास या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद आणि आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येते.
दादा भुसे यांना कृषिमंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. त्यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार जाईल, असे कार्यकर्त्यांनीदेखील होर्डिंग रंगवले होते, परंतु तुलनेने कमी महत्त्वाचे असे बंदरे व खनिकर्म हे दुय्यम खाते त्यांना मिळाले आहे, तर रवींद्र चव्हाण यांनी जी धावपळ केली त्याचे फळ म्हणून त्यांना सार्वजनिक बांधकाम याचा मर्यादित कारभार देण्यात आला आहे, तर अब्दुल सत्तार यांना औरंगाबादचा गड राखणे सोपे व्हावे आणि मतदारसंघात वजन वाढावे, यासाठी थेट कृषी मंत्रालयाचा परिवार देण्यात आला आहे. अतुल सावे यांनादेखील सहकार खाते देऊन त्यांचा मोठा सन्मान केल्याचे मानले जात आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये सुभाष देसाई यांच्याकडे असलेले उद्योग खाते उदय सामंत यांना देण्यात आले आहे.