स्पष्ट विचाराच्या लढवय्याला महाराष्ट्र मुकला

गोपीनाथ मुंडेंनंतर बीडकरांना दुसरा मोठा धक्का
मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला आहे, अशी भावना व्यक्त होते आहे, तर मराठा समाजासाठी लढणाऱ्या लढवय्याला महाराष्ट्राने गमावले आहे.
मेटे यांच्या निधनाने सर्वच राजकीय पक्षांनी दु:ख व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे ते रहिवासी होते. बीड जिल्ह्यापासून मुंबईच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करणाऱ्या नेत्याचा अंत झाल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाला एक मोठा धक्का मानला जात आहे. दोन वर्षांनंतर रविवारी दुपारी १२ वाजता मराठा समाजाची बैठक पार पडणार होती. त्याच बैठकीसाठी विनायक मेटे कारने निघाले होते. मराठा समाजासाठी कायम लढा देणारा हा आमदार हे मराठा महासंघाचे पदाधिकारी होते. त्यांच्या जाण्याचे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले असल्याची भावना मराठा क्रांती मोर्चासमर्थकांकडूनही व्यक्त केले जात आहे. मेटे हे बेधडकपणे समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका नेहमी राबवत होते.
मोजक्या आमदारांपैकी ते एक असे आमदार होते, जे की विधान परिषदेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडायचे. समाजासाठी हा खूप मोठा तोटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. हा तोटा भरून कसा काढता येईल, हा मोठा सवाल आता मराठा क्रांती मोर्चा समर्थकांमध्ये पडला आहे. आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. तसेच, अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. मेटे सलग पाच टर्म विधान परिषद सदस्यही राहिले आहेत.