महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटलांचा बावधन येथे सन्मान

पुणे : महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी पै. पृथ्वीराज पाटील याचा पुण्यात आल्यानंतर पहिला सन्मान करण्याचा मान बावधनकरांनी मिळवला असून पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी पृथ्वीराज यांचा विशेष गौरव केला.
बावधन येथील राजभवन या राजेंद्र बांदल यांच्या बंगल्यातील झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, राष्ट्रीय सुवर्णपदकविजेता सोनबा गोंगाणे व प्रशिक्षक अमर निंबाळकर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवित करण्यात आले. यावेळी पै. पाटील व गोंगाणे यांना राजेंद्र बांदल यांच्याकडून रोख रक्कम बक्षीस देण्यात आली. पृथ्वीराजचे चुलते संग्राम पाटील, बंधू राज पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्यात पृथ्वीराजचा रोख रक्कम देऊन सर्वात पहिला सत्कार करण्याचा मान बांदल यांना मिळाला आहे.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, की हा सन्मान माझा नसून महाराष्ट्रातील जनतेचाच आहे. तरी महाराष्ट्रातील मल्लांनी कठोर परिश्रम घेऊन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे.याप्रसंगी लेखक व पत्रकार संजय दुधाणे, पेरिविंकल स्कूलच्या संचालिका रेखा बांदल, युवा उद्योजक यश बांदल, अमित बांदल, योगेश सोनावणे, दीपक कंधारे, प्रदीप साठे, रवींद्र चौधरी, गुरू कामशेट्टी, किरण कुडपणे आदी मान्यवर उपस्थित होते.