‘अशी’ होती सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांची राजकीय कारकीर्द
नाशिक Manikrao Gavit Dies : सलग नऊ वेळा खासदार राहिलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून गावित यांची प्रकृती खालवलेली होती.
नाशिकच्या सुयश खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारासदरम्यान त्यांचे निधन झाले. गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरून वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. गावित 88 वर्षाचे होते शनिवारी 17 सप्टेंबर सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. उद्या (१८ सप्टेंबर) नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
राजकीय कारकीर्द
1965 मध्ये ग्रामपंचायत पासून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. 1981 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर त्यांनी कधी पराभव पाहिलाच नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदे न मागताच त्यांना मिळाली. 2014 मध्ये पहिल्यांदा माणिकराव गावित यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
२००९ मध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, प्रणव मुखर्जी यांच्यासह सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ हंगामी अध्यक्ष म्हणून गावित यांनी दिली होती.
सलग नऊ वेळा काँग्रेसकडून नंदुरबार लोकसभा मतदार संघातून निवडून येत राहिलेले माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी 2019 लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती मात्र, काँग्रेसने के सी पाडवी यांना तिकीट दिलं. त्यामुळे भरत गावित यांनी निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माणिकराव गावित यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार आहेत.