मनमोहन सिंहांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त

दिल्ली : नम्र व्यक्ती ते प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ असा प्रवास मनमोहन सिंह यांनी केला. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचे कामही अभ्यासपूर्ण होते. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वार त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.