आंदोलन मागे घेणार की नाही? मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “आम्ही दहा पावलं मागे यायला तयार आहोत, पण…”
![आंदोलन मागे घेणार की नाही? मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "आम्ही दहा पावलं मागे यायला तयार आहोत, पण..." manoj jarange](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/manoj-jarange-780x470.jpg)
जालना | Manoj Jarange Patil – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आंदोलन मागे घेणार की नाही? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर आज (7 सप्टेंबर) मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदत घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत केलं. तसंच जीआर दुरूस्त करून आणला तरच संपूर्ण न्याय झाला असं, मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कडक इशारा देखील दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि त्यांच्या निर्णयावर आम्ही दहा पावलं मागे यायला तयार आहोत. पण सरकारनं एक काम करावं. आम्ही सुचवलेली दुरूस्ती त्यांनी करावी. जीआर दुरूस्त करून त्यांनी आणला पाहिजे. तरच आम्हाला संपूर्ण न्याय मिळाला, असं म्हणता येईल. त्याचबरोबर जोपर्यंत आमची सरसकट प्रमाणपत्राची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
काल सरकारनं ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्या मराठा व्यक्तीला कुणबी जातप्रमाणपत्र आजपासून दिले जाईल, असा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेतला म्हणजे न्याय झाला नाही. त्यांनी आमची फक्त 70 टक्के मागणी मान्य केली आहे. त्यामुळ मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावं अशी आमची मूळ मागणी आहे, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.