आरोग्यमंत्र्यांचा राज्यांना सतर्कतेचा इशारा! कोरोनासंबंधी केंद्र सरकार अॅक्शन मोडवर…
नवी दिल्ली : (Mansukh Mandaviya On all State) जागतिक स्तरावर कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिले आहेत. या संदर्भात राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून एकभावनेनं काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेतली. आजच्या बैठकीत त्यांनी कोरोनासंबंधीत ताजी स्थिती काय, तसेच राज्यांची त्यासंदर्भात तयारी काय आहे याचा आढावा घेतला. जगभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्याचा पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांचा फॉलोअप घ्यावा, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना दिले आहेत. राज्यानी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावं आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे असेही निर्देश त्यांनी दिले.