सोशल मीडियाद्वारे आवाज उठविण्याची संधी
![सोशल मीडियाद्वारे आवाज उठविण्याची संधी mit 4](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/mit-4-780x470.jpg)
पुणे : अन्न, वस्त्र, निवारा आणि कनेक्टिव्हीटी या आजच्या काळातील मूलभूत गरजा आहेत. डिजिटल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. याच गोष्टीचा लाभ घेण्यासाठी माध्यमे, राजकारण आणि उद्योग यांचे विलीनीकरण होताना दिसतेय. माध्यमांचा उपयोग करून आपले स्थान मजबूत करण्यावर राजकारण्यांकडून भर दिला जात आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी केले.
“कोविड काळात ओटीटी, मोबाईल जर्नालिझमने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. वृत्तपत्रे, वाहिन्या यांसह सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या नवमाध्यमांचा प्रभाव मोठा आहे. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप द्वारे परिवर्तनाच्या मोहिमा राबवल्या गेल्या. आज ही माध्यमे आपल्या प्रत्येकाच्या हाती आल्याने प्रत्येकाला आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे.”
– जवाहर सरकार
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या वतीने आर. के. लक्ष्मण म्युझियम, मुंबई प्रेस क्लब, द फॉरेन करस्पॉंडंट क्लब आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने विश्वराज बाग, लोणी काळभोर येथील विश्वशांती सभागृहात (घुमट) आयोजित ३ दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
एनडी टीव्हीचे वरिष्ठ संपादक सुशीलकुमार महापात्रा (ब्रॉडकास्ट), मुक्त पत्रकार रवलीन कौर (प्रिंट) व मुक्त पत्रकार नीतू सिंग (डिजिटल) यांना पहिला ‘जर्नालिझम फॉर पीस’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.