बौद्धिक अक्षम (दिव्यांग) विद्यार्थ्यांची मेट्रो सफर

पिंपरी : नुकताच पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात पिंपरी ते फुगेवाडी असा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आलेला आहे. या मेट्रो मार्गातून सफर करण्यासाठी शहरातील प्रत्येकाला एक कुतूहलाचा विषय झालेला आहे. आजतागायत या मेट्रो मार्गातून ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी तसेच तृतीयपंथीय यांना मेट्रो सफर घडविण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन त्यांना मेट्रो सफर घडवून आणली. परंतु आज नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांच्या पुढाकाराने झेप रिहॅबिलिटेशन सेंटरमधील ४० (बौद्धिक अक्षम) विद्यार्थ्यांसह झेपमधील शिक्षकांना पिंपरी ते फुगेवाडी ते पिंपरी अशी मेट्रो सफर घडवून आणली. या मेट्रो सफरीमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रवासाचा मनमुराद आनंद घेतला. मेट्रो सफर करताना या मुलांच्या चेहर्यावर विलक्षण कुतूहल दिसून येत होते.
खरेतर सर्वसामान्यांना मेट्रोतून प्रवास करणे सहज शक्य असते, परंतु अशा बौद्धिक अक्षम मुलांना मेट्रोतून प्रवास घडवून आणणे हे फार जिकिरीचे होते. ही सफर यशस्वी करण्यासाठी झेप रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संस्थापक सचिव नेत्रा पाटकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच डी. वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या मेट्रो सफरीसाठी पिंपरी येथील स्टेशन कंट्रोलर शुभांगी जाधव, फुगेवाडी येथील स्टेशन कंट्रोलर श्रावणी जाधव, सुरक्षाप्रमुख सुनील पाटील, मेट्रोचा सर्व कर्मचारीवर्ग व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संचालक सुधीर मरळ यांनी मोलाचे सहकार्य केले.