“आमचे 6 नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”
!["आमचे 6 नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?" Uddhav Thackeray Raj Thackeray 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/Uddhav-Thackeray-Raj-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. याचाच धागा पकडत मनसेने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.
मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचलं आहे. राज ठाकरे आणि अयोध्येमधील राम मंदिराचा फोटो असणारे बॅनर्स भानुशाली झाली आपल्या विधानसभा क्षेत्रात झळकावले आहेत. या बॅनरवर, त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?, असं लिहिलं आहे.
दरम्यान, मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. शिंदे तुमचे 36 आमदार घेऊन गेले. म्हणजे सहा गुणीले सहा. याचा अर्थ सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागली असल्याचं महेंद्र भानुशाली यांनी म्हटलं आहे.