राष्ट्रसंचार कनेक्ट

महापालिकेकडून तृतीयपंथीयांसाठी मेट्रो राइडचे आयोजन

पिंपरी : तृतीयपंथीयांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त अजय चारठणकर यांच्या पुढाकारातून शुक्रवारी तृतीयपंथी समाजासाठी खास पीएमपीएमएल बस व मेट्रो राइडचे आयोजन करण्यात आले.

उपायुक्त अजय चारठणकर म्हणाले, तृतीयपंथीय समाजाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सहजतेने करावा, यासाठी आज बस आणि मेट्रो सफरीचे प्रयोजन करण्यात आले. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे याकरिता महापालिका प्रयत्नशील आहे. येत्या काळात हा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. नागरिकांनीदेखील या समूहाला सन्मानाची वागणूक दिल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभार लागेल.
पुणे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी उपस्थितांना मेट्रो स्टेशन, तेथील सुविधा, सुरक्षा याविषयी माहिती दिली. स्मार्ट सिटी टीमतर्फे पीसीएमसी स्मार्ट सिटी या शहराच्या अधिकृत अ‍ॅपची माहिती देण्यात आली, तसेच या अ‍ॅपमध्ये सर्वत्र लिंग निवडताना पुरुष, महिला, तृतीयपंथी असे तीनही पर्याय देण्यात आल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जागतिक ट्रान्सजेंडर दिनाच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रमात आयुक्त राजेश पाटील यांनी तृतीयपंथी नागरिकांसाठी प्रशासनामार्फत आर्थिक सक्षमीकरण योजना, सामाजिक उपक्रम राबवण्याचे व्हिजन मांडले. शहराचा आम्हीही एक घटक आहोत हा विश्वास या समाजात वाढीस लागेल अशी यामागची प्रशासनाची भूमिका आहे, हे त्यांनी नमूद केले. त्यालाच अनुसरून महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत बस व मेट्रो राइडचे आयोजन करण्यात आले.

मेट्रो सफर घडविल्याबद्दल आभार
– यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएमपीएमएल बसने भक्तीशक्ती, निगडी टर्मिनलवरून या सर्वांना पीसीएमसी मेट्रो स्टेशनपर्यंत आणण्यात आले. तिथून पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोची सफर घडवली. पहिल्यांदा मेट्रोत प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो, अशी प्रतिक्रिया देत पालिकेच्या या उपक्रमाचे आणि आम्हाला समाजातील इतर घटकांप्रमाणेच सामावून घेतल्याबद्दल तृतीयपंथीयांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये