फार्महाऊसमध्ये कोंडून तीन वर्षे बलात्कार; पीडित मुलीला ११ दिवसांचं बाळ

नागपूर : नागपुरातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला तेलंगणातील एका फार्महाऊसवर कोंंडून ठेवले. तिच्यावर सलग तीन वर्षे बलात्कार करण्यात आला. त्या पिडित मुलीचा शोध मानवी तस्करी विरोधी पथकाने लावला असून तिला ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात घेतले. अपहरणकर्त्या युवकाला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये पिडीत मुलगी १२ व्या वर्गात शिकत होती. त्यावेळी आरोपी आकाश ओमप्रकाश गुल्हाणे (२३) रा. तेलंगणा याची आणि स्विटीची ओळख झाली. आकाशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. मात्र, तिने नकार दिला. मात्र, त्याने युक्ती लढवत तिला ३१ मार्च २०१९ ला तासाभरासाठी फिरायला जायचे असल्याचे सांगून दुचाकीवर बसवून घेऊन गेला. सायंकाळच्या सुमारास त्याने तिला खाण्याच्या पदार्थात गुंगीचे औषध देऊन थेट तेलंगणात नेले.
मुलीचे अपहरण करून तेलंगणाकडे नेल्याची माहिती मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांना मिळाली. तीन दिवस सतत शोधाशोध केल्यानंतर आकाशला अटक केली. स्विटीला ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात घेतले. स्विटीला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तिने आकाशने केलेल्या लैंगिक अत्याचाराच पाढा वाचला, त्यामुळे पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहिला.