“शिवसेना सोडली तेव्हा मला संपवण्यासाठी…”, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

मुंबई | Narayan Rane On Uddhav Thackeray – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आज 26 आणि 27 जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. उद्धव ठाकरेंच्या याच मुलाखतीवर अनेक नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
यावेळी नारायण राणे म्हणाले, मी 2005 मध्ये ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी मला संपवण्यासाठी अनेकांना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. यामध्ये देशातल्या आणि देशाबाहेरील गँगस्टर्सचा समावेश होता. मात्र, मी त्यावेळी यावर काहीच बोललो नाही. कारण या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ होतो. या सर्व परिस्थीतीत वाचलो तो केवळ माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो, असं म्हणत ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्या व्यक्तीदेखील माझ्याशी बोलल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मराठी माणसाची आठवण झाली. मी त्यांना गेल्या 40 वर्षांपासून ओळखत असून त्यांच्या अंगात दृष्टपणा आणि कपटीपणा भरलेला आहे. सत्तेतील अडीत वर्षात ठाकरेंनी कोणतेच काम केलेलं नसून, आजरपण आणि मातोश्री या दोन्हीमध्येच त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ गेला. आज सामनामध्ये प्रकाशित झालेली ठाकरेंची मुलाखत ही ठरवलेल्या प्रश्नांवर होती असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.
पुढे नारायण राणे म्हणाले, ठाकरेंना पदावरून पायउतार केल्यानंतर संजय राऊत मनातून खूश असून, ठाकरेंची मुलाखत म्हणजे राऊतांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. संजय राऊत म्हणजे बनावट पत्रकार असून, त्याची लायकी नाही, त्याला काही दर्जा नाही. राऊत उद्धव ठाकरेंना त्यांच्या तालावर नाचवत आहेत. शिवसेनेचा वारसा रक्ताने नाहीतर विचाराने चालत असतो. शिवसेनेत असताना आईवडिलांचं ऐकलं नाही अन् आता काय म्हणता शिवसेना आमची आहे? उद्धव ठाकरेंनी प्रेम, विश्वास दिला नाही, तो एकनाथ शिंदेंनी दिला. खरं तर संजय राऊतांनी शिवसेना फोडली असून, या कामगिरीनंतर राऊत मनातून खूश आहेत असं देखील राणे यांनी म्हटलं आहे.