‘गोल्डन ग्लोब’साठी पत्रकार नरेंद्र बंडबे यांची मतदार म्हणून निवड
!['गोल्डन ग्लोब'साठी पत्रकार नरेंद्र बंडबे यांची मतदार म्हणून निवड rashtrasanchar news 2023 04 07T115846.607](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/04/rashtrasanchar-news-2023-04-07T115846.607-780x470.jpg)
Golden Globe : यंदाचं हे वर्ष भारतीय कलाक्षेत्रासाठी खास ठरतंय. आंतररराष्ट्रीय तापळीवर भारतातील कलाकृतींचा गौरव होतोय. ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारावर मोहोर उमटली. हा तमाम भारतीयांसाठी आणि भारतीय चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण होता. आता महाराष्ट्रासाठी आणखी एक भन्नाट आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.
जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’चा आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून मुंबईतले पत्रकार नरेंद्र बंडबे यांची निवड झाली आहे. यंदा या पुरस्काराचे 81 वे वर्ष आहे. त्यासाठी बंडबे यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून भारतातून निवडल्या गेलेल्या काही मोजक्या पत्रकारांपैकी ते एक ठरले आहेत. नरेंद्र बंडबे जागतिक सिनेमांचे मराठी भाषेतून समीक्षण करत असतात. गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून निवड झालेले ते एकमेव मराठी चित्रपट समीक्षक ठरले आहेत. सध्या जगभरात गोल्डन ग्लोब पुरस्कराचे 200 हून अधिक मतदार आहेत.
‘द हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’ (HFPA) तर्फे ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ 1944 सालापासून देण्यात येतो. ज्यासाठी जगातल्या 62 देशांमधले मतदार मतदान करतात. सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रासाठीचे पुरस्कार या नावाखाली देण्यात येतात. गेल्या वर्षी जगभरातून 103 पत्रकारांची मतदार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात मिनाक्षी शेड्डे या एकमेव भारतीय पत्रकार होत्या. यंदा त्यात नरेंद्र बंडबे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.