आदिवासी मुलांच्या सखोल ज्ञानाने नटले विज्ञान प्रदर्शन

पुणे : एरवी आदिवासी समाजातील मुले आपल्याला शिक्षणात, लिखाणात नेहमीच मागे पडलेली दिसतात, परंतु त्यांच्याकडे त्यांच्या काही उपजत क्षमता आहेत ज्याला पुढे आणण्याची व त्याला सन्मानित करण्याची प्रचंड गरज आहे. त्यामुळे ही मुले याच ज्ञानाचा उपयोग करून स्वतःच्या पायावर सन्मानाने उभी राहू शकतात. हे वर्क फॉर इक्वालिटी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित खेड येथे विज्ञान प्रदर्शनातून दिसले. आदिवासी समाजातील मुलांमध्ये असलेले ज्ञान पुढे आणण्यासाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ ठरले. यात आदिवासी समाजातील मुलांनी त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण ज्ञानाने उपस्थितांना अचंबित केले. आदिवासी मुलांमध्ये झाडे, फुले, पाने, पक्षी, जमीन, जंगल यावर आधारित खूप ज्ञान आहे.
१० वर्षांची ऐश्वर्या त्यांच्या परिसरातील नदीत आणि विहिरींमध्ये असलेल्या किमान १५-२० वेगवेगळ्या माशांची माहिती पटापट सांगते. १० वर्षांचा कार्तिक नुसत्या पक्ष्यांच्या पंखावरून किमान १२-१५ पक्ष्यांची नावे सांगू शकतो. १५ वर्षांच्या अश्विनीने तिच्याच परिसरातील ६० प्रकारच्या बिया जमा करून त्याचे जतन करण्याची सुरुवात केली आहे. १५ वर्षांचा योगेश ताजे झाडावर चढून काढलेले मधाचे पोळ तोंडाला लावून मिटक्या मारत मारत खातो आणि जंगलात कोणकोणत्या प्रकारचे मध मिळते, ते कसे काढायचे, कोणत्या प्रकारचे मध खायला चांगले, अशी अचंबित करणारी माहिती सांगतो.
हे ज्ञान जीवन जगताना खर्या अर्थाने गरजेचे आहे. या ज्ञानाच्या आधारे जर या मुलांचे मूल्यमापन केले तर ते इतर मुलांना खूप मागे टाकतील. पण दुर्दैवाने या ज्ञानाला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेच स्थान दिले जात नाही. आदिवासी समाजाच्या मुलांकडे असलेल्या या ज्ञानाची शिदोरी सर्वांना मिळावी म्हणून जसे ‘वर्क फॉर इक्वालिटी’ सामाजिक संस्थेने विज्ञान प्रदर्शन व त्यावर आधारित शोध – मुलांचे विज्ञान प्रकल्प हे पुस्तक मुलांच्याच भाषेत प्रकाशित केले हे अत्यंत कौतुकास्पद होते.