राष्ट्रसंचार कनेक्ट

निघोजचे रांजणखळगे

सुशील दुधाणे

निसर्गाचा वैशिष्ठ्यपूर्ण आविष्कार ः राजंणखळगे
निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सीमेवरील, तसेच अहमदनगरपासून ७० किमी अंतरावर असलेल्या निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरीत्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे.
नैसर्गिकरीत्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरश: विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्ड्यांचा आकार रांजणासारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही. अनेक वर्षांपूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कुकडी नदीच्या पात्रात साधारण २०० मीटर लांब व ६० मीटर रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास पाहावयास मिळतात. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या छानशा कुंडांमुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. कुकडीचे रांजणखळगे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही येथे येत असतात. रांजणखळग्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली ह्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याकरिता जगभरातील तज्ज्ञमंडळी आवर्जून भेट देत आहेत. (क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये