निर्मलवारी : सायकलस्वार पंढरपूरकडे मार्गस्थ
सायकल स्वारांचे भिगवणमध्ये स्वागत
पुण्याहून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेल्या ९५० सायकल स्वरांचा भिगवणमध्ये सायकल क्लबच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या सर्व सायकल स्वारांसाठी गुलाब सरबत, थंड पाणी, केळी आधीचे नियोजन करण्यात आले होते. या सायकल वारी मध्ये वय वर्ष १२ ते ८० वर्षाच्या नागरिकांचा सहभाग होता तसेच महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.
पिंपरी : आरोग्य, क्रीडा आणि पर्यावरणासाठी काम करणार्या इन्डो अॅथलेटिक्स सोसायटीची पुणे-पंढरपूर-पुणे सायकलवारी आज (शनिवारी) पहाटे चार वाजता निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. काही सायकलस्वार देहूतील गाथा मंदिर येथून मार्गस्थ झाले. १२०० हून अधिक सायकलभक्तांनी यात सहभाग घेतला आहे. एका दिवसात देहू ते पंढरपूर असे २५० किलोमीटर अंतर ते पार करणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपीएमएल)चे जनरल मॅनेजर सुबोध मेडसीकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकलवारीला पहाटे चार वाजता सुरुवात झाली.
याप्रसंगी पोलिस अधिकारी अजय दरेकर, उद्योजक अण्णा बिरादर, इंडो अॅथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील उपस्थित होते. १२०० सायकलस्वारांच्या पुणे-पंढरपूर-पुणे ५०० किमी सायकलवारीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे इन्डो अॅथलेटिक्स सोसायटीतर्फे सालाबादप्रमाणे होणार्या पुणे-पंढरपूर-पुणे सायकलवारीचे आज निगडी येथून प्रस्थान करण्यात आले. यंदा १२०० हून अधिक सायकलभक्त सहभागी झाले आहेत. सायकलवारीसाठी एप्रिल महिन्यामध्ये आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकादशी निमित्त रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
सायकलवारीत सहभागी झालेले १२०० हून अधिक सभासद एका दिवसात देहू ते पंढरपूर असे २५० किलोमीटर अंतर पार करणार आहेत. सायकलभक्त आजचा मुक्काम पंढरपूर येथे करणार आहेत. पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत. उद्या रात्री ८ वाजेपर्यंत सायकलवारी पुण्यात पोहोचेल, असे इंडो अॅथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे यांनी सांगितले. देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवण – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर आणि दुसर्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास होणार आहे.