नितीन गडकरींनी योगी आदित्यनाथांची तुलना केली थेट भगवान श्रीकृष्णाशी; म्हणाले, “जेव्हा पृथ्वीवर…”

गोरखपूर | Nitin Gadkari – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची तुलना भगवान श्रीकृष्णाशी (Shrikrushna) केली आहे. श्रीकृष्णाप्रमाणे योगी आदित्यनाथ हे समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलतात, असं नितीन गडकरी म्हणाले. ते उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काल (13 मार्च) नितीन गडकरींच्या हस्ते उत्तर प्रदेशमध्ये 10 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपुजन आणि लोकार्पण पार पडलं. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी योगी आदित्यनाथांच्या कामांचं कौतुक केलं. “उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनी अनेक विकासकामं केली आहेत. महोबा ही वीर योद्ध्यांची भूमी असून या भूमीला समृद्ध इतिहास आहे. राज्याच्या पर्यटनाला झाशी-खजुराहो रस्त्याच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळेल”, असं गडकरी म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी योगी आदित्यनाथांची तुलना थेट भगवान श्रीकृष्णाशी केली. “काही दिवसांपूर्वी माझ्या पत्नीनं मला विचारलं की उत्तरप्रदेशमध्ये काय सुरू आहे? तेव्हा मी भागवत गीतेचा दाखला देत म्हणालो, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो, तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण जन्म घेतात. तसंच श्रीकृष्णाप्रमाणेच योगी आदित्यनाथांनी वाई़ट प्रथा आणि समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो”, असं नितीन गडकरी म्हणाले.