पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त अन् नितीन गडकरींकडून चांदणी चौकाची हेलीकाॅप्टरमधून पाहणी
![पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त अन् नितीन गडकरींकडून चांदणी चौकाची हेलीकाॅप्टरमधून पाहणी nitin gadkari](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/nitin-gadkari-780x470.jpg)
पुणे | Nitin Gadkari – काल (29 सप्टेंबर) रात्री पुण्यातील चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. याच दरम्यान आज (30 सप्टेंबर) केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली आहे.
रविवारी (2 ऑक्टोबर) मध्यरात्री दोन वाजता चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांनी पाडला जाणार आहे. या संपूर्ण कामाचा आणि पूल कसा पाडला जाणार याची माहिती नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. तसंच गडकरी यांनी चांदणी चौकातील संपूर्ण कामाचा आढावा हवाई मार्गानेच घेतला आहे. त्यामुळे गडकरींनी केलेल्या हवाई पाहणीमुळे त्यांना पुणेकरांचा त्रास कसा समजणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया सुरू असून एक लेन बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत काही आपत्तीजनक प्रसंग आला, अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका जायची असेल तर मार्ग कसा काढणार असा प्रश्न उपस्थित होतोय. वाहतूकीचं नियोजन करणाऱ्यांकडे देखील याबाबत स्पष्टता नाही.