जुने स्वप्न!

मुंबई महापालिका स्वबळावर जिंकणे आणि चार दशकांची शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढणे, यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाह्या सरसावल्या आहेत…
मुंबई जिंकण्याचे भाजपचे स्वप्न खूप जुने आहे. मुंबई शिवसेनेकडून हिसकावण्याचा प्रयत्न हा भाजपने अनेक वर्षांपासून चालवला आहे. तरी त्यांच्या विरोधात, कधी छुपेपणाने, तर कधी त्यांच्यासोबत राहून भाजपचा झेंडा मुंबई महापालिकेवर लागावा, ही शहा-मोदी यांची तीव्र इच्छा आहे, हे लपून राहिलेले नाही. आज अमित शहा यांनी मुंबई दौरा केला, त्या वेळीदेखील त्यांनी मुंबई महापालिकेलाच लक्ष्य ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेचा रणसंग्राम समोर असताना फक्त आता भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांची भागीदारी ठेवावी लागणार आहे.
शिंदे-फडणवीस हे एकत्रितपणे सेना-भाजप माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील; त्यामुळे भाजपच्या बरोबरीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचादेखील मोठा दावा असणार आहे. त्यामुळे या लढ्याला चेहरा कुणाचा द्यायचा, हा प्रामुख्याने आज चर्चेचा प्रश्न आहे. शिंदे यांच्या मनात यशवंत जाधव यांचे नाव जरी असले, तरी एकूणच त्यांची डागाळलेली प्रतिमा पाहता अमित शहा यांच्याकडून त्याला कौल मिळणे अवघड आहे. तसेच हा चेहरा देत असताना पूर्णपणे शिंदे यांचा एकनिष्ठ चेहरा देणेदेखील भाजप टाळेल, असे दिसते. भविष्यात राजकीय तडजोडी कराव्या लागल्याच, तर हा नेता भाजपच्याच बाजूने आपले माप टाकेल, याचाही प्रयत्न फडणवीस-शहा जोडी करेल यात शंका नाही. एकीकडे दसरा मेळाव्यासाठी संघर्ष टीपेला जात असताना आज शहा यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर थेट खंजीर खुपसल्याचा आरोप केला; त्यालाही महापालिकेच्या आगामी लढ्याचीच पार्श्वभूमी आहे.
शरद पवारांची जी प्रतिमा विश्वासघातकी म्हणून महाराष्ट्रात उभी राहिली आणि त्यामुळे एका मर्यादित जागांपर्यंत त्यांना यश मिळाले, तीच अवस्था शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची व्हावी, अशी अमित शहा यांची स्ट्रॅटेजी असावी. त्यामुळे ठाकरे यांच्यावर विश्वासघाताचा ठपका ठेवत, त्यांची प्रतिमाच मलिन करण्याचा पुरेपूर प्रयत्न शहा यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शक असले, तरी ते संपूर्ण भाषण आणि त्यातले शब्द माध्यमांमध्ये कसे जातील आणि सडकून टीकेची प्रतिमा कशी निर्माण होईल, याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. अत्यंत आक्रमकतेने भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये या महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार, हाच संदेश त्यांना द्यायचा होता; तो त्यांनी पद्धतशीरपणे दिलाही.
परंतु शिंदेंसाठी देखील मुंबई तितकी सोपी नाही. मुंबईत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेच! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेथे फारसे बळ नाही. दसरा मेळाव्यावरून उडवलेला वाददेखील अनेक शिवसैनिकांना रुचलेला नाही. परिवारवाद हा वेगळा मुद्दा असला, तरीदेखील उद्धव ठाकरे यांच्या हातातून, तोंडातून, लचकेदेखील काढून घ्यायचे हा आततायीपणा सामान्य जनतेलादेखील फारसा पटलेला नाही. सत्तेचा अति व महत्त्वाकांक्षी प्रयत्न दिसू नये, ही काळजी खरे तर एकनाथ शिंदे यांनी घेतली पाहिजे.
सत्तासंघर्ष हा वैयक्तिक टीकेवर गेलाच आहे; परंतु तो आता वैयक्तिक द्वेषावर आणि पराकोटीच्या मत्सरावर जाऊ नये, हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपलादेखील एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेचा कोठे तरी फटकाच बसेल, असे दिसते. परंतु मुंबईतील प्रश्न, त्याबद्दलची नाराजी यामुळेदेखील काही प्रमाणातील मते ही भाजपकडे वळतील मुंबईचा हा रणसंग्राम या दोन्ही-तिन्ही पक्षांकरिता फारसा सोपा नसल्याचेच दिसते. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. एकट्या महाराष्ट्राचे अर्थकारण एकीकडे आणि मुंबईचे अर्थकारण एकीकडे आणि याची जाण गुजराती असलेल्या अमितभाई शहा यांना नेमकी आहे. त्यामुळे मुंबईच्या सत्ताकारणापेक्षा तेथील अर्थकारणावर आरूढ होण्याचे त्यांचे जुने मनसुबे या निमित्ताने पुरे करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे.