“आमचा रावण हा…”, ‘आदिपुरूष’मधील रावणाच्या लूकवरून होणाऱ्या टीकेला ओम राऊत यांचं प्रत्युत्तर

मुंबई | Om Raut – ‘आदिपुरूष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. प्रभासचा (Prabhas) श्रीराम यांचा लूक आणि सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) रावणाच्या लूकवरून प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तसंच चित्रपटातील व्हीएफएक्सवरून तर लोकं टीका करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी रावणाच्या सादरीकरणाबद्दल भाष्य केलं आहे.
‘आज तक’शी संवाद साधताना दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, “आमच्या चित्रपटातील रावण हा आजच्या काळातील क्रूर रावण आहे. ज्याने आमच्या माता सीतेचं अपहरण केलं आहे. आजच्या काळात रावण जितका क्रूर दाखवता येईल तेवढा दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वाची मोहीम आहे. जे कुणी या चित्रपटावर भाष्य करत आहेत त्या मंडळींच्या मताचा आम्ही आदर करतो, शिवाय मी त्या सगळ्याची नोंदही घेतली आहे. 2023 मध्ये जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा नक्कीच तुमची निराशा होणार नाही”.
दरम्यान, या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी देखील ओम राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “लोकांनी चित्रपटाची केवळ 1 मिनिट 35 सेकंदाची झलक पाहिली आहे. लोकं म्हणतात की हा रावण खिलजीसारखा दिसतो. त्यांना मला विचारावंसं वाटतं की, कोणता खिलजी कपाळावर टिळा लावतो, अंगावर रूद्राक्ष आणि जानवं घालतो?”