महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
![महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन IMG 0491](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/IMG_0491-780x470.jpg)
महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्या संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड : ‘शब्दरंग साहित्य कट्टा’ द्वारे स्वच्छतेचे महत्त्व आणि प्लास्टिकच्या वापराचे धोके विषयावर पथनाट्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन, तसेच प्लास्टिकमुक्त शहर या विषयावर सागरमित्र अभियानाचे सहसंस्थापक विनोद बोधनकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहितीपर मार्गदर्शन केले. प्लास्टिकमुक्तीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक संकलित करता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्लास्टिकमुक्त शहर होण्यासाठी स्वत: प्लास्टिकमुक्त जीवनशैली अंगीकारणे गरजेचे असून, वापर केलेले कोरडे प्लास्टिक फेकून न देता त्याची वेगळी रद्दी करावी, असा सल्लाही बोधनकर यांनी यावेळी दिला.
सह शहर अभियंता कुलकर्णी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रास्ताविक सादर करून त्यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त शहर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या प्लॉगेथॉन, रिव्हरथॉन सारख्या अनेक उपक्रमांची तपशीलवार माहिती यावेळी दिली.
तसेच आजच्या मोहिमेत शहरातील पर्यावरणप्रेमी संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून ही मोहीम निरंतर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात महापालिका व स्मार्ट सिटी यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सन्मानपत्र आणि पर्यावरणाचा संदेश देणारे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांत सहभागी झालेल्या पर्यावरणप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव यावेळी मांडले. गेल्या वर्षभरात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रमांद्वारे कार्य करणार्या संस्थांना महापालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यामध्ये रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, निसर्गराजा मित्र जीवांचे, सावरकर मंडळ निगडी, संस्कार प्रतिष्ठान, जलदिंडी संस्था, तुकाराम तनपुरे फाउंडेशन, प्राधिकरण नगरी कृती सुरक्षा समिती, अविरत फाउंडेशन, थेरगाव सोशल फाउंडेशन, जेपीएनव्ही पालक महासंघ, भूगोल फाउंडेशन, संत निरंकारी मंडळ, भोसरी, आसरा सोशल फाउंडेशन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ, शब्दरंग साहित्य कट्टा प्राधिकरण, पवना हेल्थ क्लब, काळेवाडी, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, आकुर्डी, ज्येष्ठ नागरिक संघ, काळेवाडी आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमास सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, सागरमित्र अभियानचे सह संस्थापक विनोद बोधनकर, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्या संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, तसेच नागरिक
उपस्थित होते.