‘अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली’ राज ठाकरेंचा निशाणा नेमका कोणावर?
!['अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली' राज ठाकरेंचा निशाणा नेमका कोणावर? raj thackeary pune image](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/raj-thackeary-pune-image.jpg)
पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलत होते यावेळी ते म्हणाले, अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप असून महाराष्ट्रातून यासाठी रसद पुरवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी अयोध्येचा दौरा का स्थगित केला याचही कारणं राज यांनी स्पष्ट केलं आहे. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात भावना समजत नाहीत. ऐन निवडणुकीवेळी महाराष्टातील मनसेच्या कार्यकर्त्यांमागे कोर्ट कचेरीच्या गोष्टी मागे लावल्या असत्या. पुढे ते म्हणाले, माझ्या पायाचं दुखणं वाढलं असल्यानं कंबरेला त्रास होत आहे. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं आहे. अनेकजण यावर पोपटासारखे बोलायला लागेलत पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आहे.
दरम्यान, आज यासंदर्भातील भूमिका सांगण्यासाठी मनसेनं ही सभा घेतली आहे. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली आहे. अयोध्यावारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला आहे. मात्र, हा टोला नेमका कोणाला होता हे गुलदस्त्यातच राहिलं. जो तो अपापल्या बुद्धीनं त्याचा अर्थ घेत आहेत. सभेदरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना टोला लगावला. निवडणुका नाही काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असंही ते म्हणाले आहेत. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये एकत्र जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.