“हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्यास विरोध म्हणजे संविधानाला विरोध”
!["हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्यास विरोध म्हणजे संविधानाला विरोध" sudhir mungantiwar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/sudhir-mungantiwar-780x470.jpg)
नागपूर | Sudhir Mungantiwar – महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यापासून राज्यात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. वंदे मातरमला विरोध करणं म्हणजे संविधानाला विरोध करण्यासारखं आहे, असं मत राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, वंदे मातरम म्हणण्याला रझा अकादमीने विरोध केला आहे. मात्र, आम्हाला त्यांचे मत परिवर्तन करायचे आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी या मोहिमेत भाग घ्यावा व स्वत:ला सवय लावावी. कारण हॅलो शब्दाची सवय झालेली आहे. प्रयत्नपूर्वक काही शब्द रूढ होतात. वंदे मातरम बाबत राजकारण नको. संविधानाने त्याला राष्ट्रगानचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे वंदे मातरमला विरोध करणं म्हणजे संविधानानं दिलेल्या शब्दाला विरोध करण्यासारखं असल्याचं ते म्हणाले.
वंदे मातरमचा अर्थ या भूमीला नमन करणे असा आहे. वंदे मातरम हा राजकीय किंवा जातीय शब्द नाही. यात शिवसेनेचं किंवा कोणत्या पक्षाचं काय मत आहे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. माझ्या दृष्टीने बोलताना वंदे मातरम म्हणण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करायचं असल्याचं देखील मुनगंटीवार म्हणाले.