‘कोथरूड गणेश फेस्टिव्हल’चे आयोजन; पालकमंत्र्यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे | Pune News – सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल यंदा दुसरे वर्ष साजरे करीत आहे. रविवार (दि. २४) व सोमवार (दि. २५ सप्टेंबर २०२३) या दोन दिवशी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असून उद्योग मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. याबाबत माहिती संयोजक आणि पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मंदार जोशी तसेच किरण साळी, सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समाजात विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्यांचा उद्घाटन सोहळ्यात कोथरुड सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. प्रामुख्याने प्रवीण बढेकर (उद्योजक), डॉ संजय चोरडिया (शैक्षणिक), डॉ. जितेंद्र जोशी (आंतरराष्ट्रीय उद्योजक), बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे (बँकिंग क्षेत्र), पं. विजय घाटे (तबला), डॉ.सलील कुलकर्णी (संगीत), देवेंद्र गायकवाड (अभिनेता–दिग्दर्शक) यांचा गौरवमूर्तीमध्ये समावेश आहे.