देश - विदेश

डोंगरावरील मुरमाड जमिनीवर फुलले नंदनवन…

पुणे : काशिग (ता. मुळशी) येथील दत्तात्रेय महादू शेळके या युवकाने आईवडील आणि भावाच्या मदतीने डोंगरउतारावरील मुरमाड जागेत नंदनवन फुलविले आहे. त्यांनी आपल्या चार एकर जागेत युनिक पाथ नावाने कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे.
ते पुण्या-मुंबईतील नोकरदार तसेच व्यावसायिकांचे शारीरिक आणि मानसिक थकवा घालविणार्‍या पर्यटकांसाठी रेसिडेन्शियल डेस्टिनेशन बनले आहे. या खासगी हिलस्टेशनची परदेशी पर्यटकांनाही भुरळ पडली आहे. मावळ आणि मुळशीच्या सीमारेषेवरील मांडवी डोंगराच्या कुशीत काशिग गाव वसले आहे. येथे शेळके कुटुंबीयांतील दत्तात्रेय हे शेंडेफळ. गावात प्राथमिक आणि कोळवणला माध्यमिक शिक्षण झालेल्या दत्तात्रेय यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांनी एम. ए., पी. जी. डी. एम. पर्यंत शिकल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे धावण्यापेक्षा शेतीमध्ये त्यांनी रस घेतला.

पशूपक्ष्यांसाठी ८ हजार झाडांची लागवड
मुळशीच्या निसर्गसौंदर्याचा अभ्यास करून पाच वर्षांपूर्वी त्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्धार केला. त्यांनी आईवडील आणि भावाच्या सहकार्याने डोंगरउतारावरील चार एकरच्या जागेत हे केंद्र सुरू करण्याचे ठरविले. नियोजनपूर्वक निसर्गातील पशूपक्षी यांच्या वाढीला पोषक ठरतील अशी ८ हजार झाडे लावली. पीक, भाजीपाला आणि फळपिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन सुरू केले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करीत त्यांनी शेतीसाठी सोलर पंप, तसेच बायोगॅसची उभारणी केली. झर्‍याचे पाणी ग्रॅव्हीटीने शेतापर्यंत आणले. घरामध्ये देशी गायी, शेळ्या, कोंबड्या पाळल्या. कृषी पर्यटन केंद्रासाठी बैलगाडी सजविली.

दरम्यान, आपल्याबरोबर गावातील युवकांनाही त्यांनी कृषी पर्यटन केंद्राच्या व्यवसायाकडे वळविले आहे. कृषी पर्यटनासंदर्भात शासनाच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिरात शेळके सहभागी होतात. त्यांच्या कार्याची दखल घेत मुळशी पत्रकार संघानेही त्यांना आयडॉल आणि मुळशी पुरस्काराने गौरविले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये