मोठी बातमी! पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन
पिंपरी चिंचवड | Laxman Jagtap Passes Away – पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचं आज (3 जानेवारी) निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते दुर्धर आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यानंतर त्यांना तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. ते इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. तसंच विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Laxman Jagtap Passes Away)
लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. ते 1992 च्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आले होते. तर 1997 च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केलं आहे. ते महापालिका स्थायी समितीचे सभापती होते. तसंच त्यांनी 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 या कालावधीत पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले आहे.