पुणेविश्लेषण

खोदा अन् वर्षभर खोदतच राहा…!

मुदतवाढ संपली तरी कामे सुरूच | ठेकेदारांची उदासीनता चव्हाट्यावर | ऐन पावसाळ्यात पुणेकरांना मनस्ताप

पुणे – PMC News | गेल्या अनेक महिन्यापासून शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदाई होत असल्याचे चित्र दिसत आहे. मलनिःसारण देखभाल दुरुस्ती (ड्रेनेज) तसेच पाणी पुरवठा विभागाकडून लाइन्स टाकण्यात येत असल्याने ही खोदाई करण्यात येत आहे. यापूर्वी या खोदाईसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करत ती १५ मे करण्यात आली. मात्र, या विभागांची कामे पूर्ण न झाल्याने आता ही खोदाई ३१ मे पर्यंत करण्यात आली. तरीही कामे मार्गी लागले नाहीत. त्यानंतर अखेरची ७ जूनची मुदतवाढ देऊन संपल्यानंतरही पुन्हा जैसे स्थी परिस्थिती असल्याने ‘खोदा अन् आता वर्षभर खोदतच रहा’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ पुणेकरांवर आली आहे.

शहराच्या मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, आणि नेहरू रस्ता यासह उपनगरांमधील रस्त्यांवरील खोदाई, लाइन्स टाकण्याची कामे पूर्ण करून ७ जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना दिले होते. मात्र, मुदतवाढ संपूनसुद्धा अद्यापही कामे सुरूच आहेत.

रस्ते दुरुस्तीसाठी ६५ कोटी रुपयांच्या निविदाही प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पुण्यातील मध्य भागातील सर्व रस्ते हे पाण्याच्या तसेच ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत. त्यांची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. खासगी मोबाइल कंपन्यांकडूनही रस्ते खोदण्यात आले आहेत. या सर्वांचा नागरिकांना नाहक त्रास होतो आहे.

सांडपाणी व्यवस्थापन विभागासह इतर काही कामाच्या खोदकामासाठी तूर्तास थोडी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आता शहरात नव्याने खोदकामास कुठलीही परवानगी दिली जाणार नाही. अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांना पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याची सूचना दिली आहे.

_डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त (मनपा)

आंबिल ओढ्याचे न झालेले सरळीकरण, नागझरी नाल्यावर झालेले अतिक्रमण यामुळे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडे माजी नगरसेवकांनी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पालिकेची उदासीनता, तर ठेकेदारांवर कारवाई कधी?
गेल्या सहा महिन्यांपासून कोथरूड येथील कासट पेट्रोल पंप ते पौड फाटा या शंभर मीटर लांबीच्या पदपथाचे काम सुरू आहे. दहा दिवसांच्या कामासाठी सहा महिने कशाला, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे खोदलेल्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. मुदतीत काम पूर्ण करणारी एकही यंत्रणा महापालिकेकडे नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ठेकेदारांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

शहरातील नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता फारच गुळगुळीत झाला आणि वाहने त्यावरून सुसाट गेल्यास अपघात होऊ नयेत, यासाठी मग पुन्हा काही तरी काम नव्याने उकरून काढले जाते. यात महापालिकेच्या पाणीपुरवठा, मल:निस्सारण अशा विभागांसह इतर सरकारी विभाग आणि खासगी केबल कंपन्यांचा सहभाग आहेच.

शहरातील समान पाणीपुरवठा प्रकल्पासाठी (२४ बाय ७) तब्बल १६०० किमीच्या जलवाहिन्या नव्याने टाकायच्या असल्याचे कारणच पालिकेला मिळाल्याने, ही खोदाई गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुरू असली, तरी अद्याप जलवाहिन्यांचे निम्मे काम पूर्ण झालेले नाही. म्हणजे, पुढील दोन-तीन वर्षेही पुणेकरांना खड्ड्यांतून वाट काढत जावे लागणार आहे.

आमच्या भागात खासगी मोबाइल कंपन्यांकडून रस्ते खोदण्यात आले आहेत. या सर्वांचा आम्हाला त्रास होतो आहे. आंबिल ओढ्याचे न झालेले सरळीकरण, नागझरी नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
_किरण पोटफोडे, स्थानिक नागरिक (आंबिल ओढा)

खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होणार हे शंभर टक्के. हे रस्ते खोदाईचे सत्र काही दिवसांत थांबेल, ही अपेक्षा फोल ठरते. नागरिकांना किमान हे काम नक्की कशासाठी सुरू आहे, ते किती दिवसांत संपेल याची माहिती देणे महापालिका कायद्यानुसार बंधनकारक आहे. दुर्दैवाने, ठेकेदाराने कामाची माहिती देणारा फलक लावला आहे की नाही, याकडे पालिका कायमच दुर्लक्ष करत आली आहे. खोदकाम सुरू असलेल्या रस्त्यांऐवजी पर्यायी रस्त्यांचा वापर करणे, सध्या तरी एवढेच काम नागरिकांच्या हाती शिल्लक आहे.

स्वतःच्या नियमांना पायदळी तुडवल्याचा हा प्रकार…
शहराचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांवर आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, शहरात सुरू असलेली कामे नागरिकांची गैरसोय करणारी आणि स्थापत्य अभियांत्रिकीच्या तत्त्वांना हरताळ फासणारी आहेत. खोदकामाच्या खड्ड्यात अशास्त्रीय पद्धतीने भराई करून त्यावर क्युरिंग न करताच काँक्रिट ओतले जाते. ड्रेनेज चेंबरसुद्धा शास्त्रीय पद्धतीने बांधली जात नाहीत. महापालिका स्वतःच्याच नियमांना पायदळी तुडवत असल्याचा प्रकार सुरू आहे.

रस्तादुरुस्ती देखभालीचा अभ्यास महत्त्वाचा : काँक्रिटच्या रस्त्यांची कामे बर्‍याच ठिकाणी सुरू असल्याने, हेच काँक्रिट खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्रास वापरण्यात येते. एका बाजूला डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँक्रिट वापरायचे आणि दुसरीकडे काँक्रिटचा रस्ता फोडावा लागला, तर तिथे डांबराच्या थराने मलमपट्टी करायची, असा पालिकेचा अजब कारभार आहे. पालिका प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली : शहरातील अनेक ठिकाणी खोदकाम सुरूच असून, त्यामुळे धोकादायक रस्ते, धूळ आणि अडथळ्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पालिकेने विविध विभागांमध्ये समन्वय ठेवल्यास हा त्रास सहन करावा लागणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये