“…त्यामुळे भाजप पॅनिक मोडवर गेली आहे”, आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
!["...त्यामुळे भाजप पॅनिक मोडवर गेली आहे", आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल praniti shinde narendra modi](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/praniti-shinde-narendra-modi-780x470.jpg)
अकोला | Praniti Shinde On BJP – सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच या यात्रेवरून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधींच्या यात्रेचं स्वरूप सांगताना ही यात्रा अकोल्यासह महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमधून जाणार असल्याचं सांगितलं आहे.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांत राहुल गांधीची भारत जोडो यात्रा येणार आहे. आमचं भाग्य आहे की ती यात्रा अकोल्यातूनही जाणार आहे. त्यानुसार, नाना पटोले इथे येणार आहेत. या यात्रेदरम्यान अकोल्यात राहुल गांधींची सभादेखील होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”.
“राहुल गांधींच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपनं धसका घेतला आहे. त्यामुळे आमची यात्रा निष्प्रभ करण्यासाठी ते वेगवेगळ्या योजना बनवत आहेत. काही वृत्तवाहिन्या मॅनेज झाल्यामुळे आमच्या यात्रेला तेवढी प्रसिद्धीही मिळत नाहीये. पण सोशल मीडियावर, यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोक राहुल गांधींसोबत चालत आहेत.नक्कीच भाजपलाही वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद या यात्रेला मिळेल. पण मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजप पॅनिक मोडवर गेली आहे”, असा खोचक टोला प्रणिती शिंदेंनी लगावला आहे.