मंत्र्यांच्या बैठकीत तडीपार गुंडाची हजेरी
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह अनेक आमदार, खासदारांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये चक्क एका तडीपार गुंडाने हजेरी लावली होती. या सर्व मान्यवरांच्या बरोबरीने ‘मानाचा पाट’ लावून बसलेल्या गुंडाची माहिती मिळताच पोलिसांचेही धाबे दणाणले. आपणच काही वर्षांकरिता पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड मंत्र्यांच्या बैठकीत बसलाय आणि याची माहिती प्रसार माध्यमांना मिळत आहे हे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी तातडीने कारवाई करुन गुंडाला ताब्यात घेतलं आहे. प्रदीप बाजीराव जगताप (वय 60, रा. सासवड) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. जगताप सराईत गुंड असून त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, प्रकाश जावडेकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
बैठक सुरू असताना डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांच्या पथकाला ही माहिती दिली. बैठकीत उपस्थित असलेली संशयित व्यक्ती जगताप असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. जगताप बैठकीस कसा उपस्थित राहिला, याची चौकशी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांना दिले आहेत.