“श्रीलंकेच्या अध्यक्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्थिती होईल”, ‘या’ आमदाराचं खळबळजनक विधान

मुंबई | श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्थिती होईल असं विधान तृणमूल काँग्रसचे आमदार इदरिस अली यांनी केलं आहे. दोन कोटी 20 लाख लोकसंख्येचे श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडलं असून शनिवारी नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. अध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक कोलंबोत एकत्र आले. त्यांनी राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानाकडे कूच केले. तसंच अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आंदोलकांच्या भीतीने शुक्रवारीच घरातून पोबारा केला होता.
ममता बॅनर्जी यांना कोलकत्तामधील सियादलाह मेट्रो स्थानकाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर इदरिस अली यांनी ही टीका केली आहे. तसंच 11 जुलैला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना हा प्रकल्प सुरू केला होता, त्यामुळे त्यांना आमंत्रित न करणं हा भेदभाव आहे. उद्घाटन समारंभासाठी राज्य सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला आमंत्रित न केल्याने तृणमूलचे नेते संतापले आहेत.