सिटी अपडेट्स

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना ’नारायण सुर्वे काव्यप्रतिभा’ पुरस्कार

नारायण सुर्वे यांच्या कर्मभूमीमध्ये कार्यक्रम
विद्या मंदिर मंडळ संचलित मातोश्री श्रीमती सुमती चिंतामणी चिटणीस महाविद्यालय नेरळ, मुंबई या नारायण सुर्वे यांच्या कर्मभूमीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते मलघे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पिंपरी : नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनामध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना उत्कृष्ट काव्यनिर्मितीबद्दल कविवर्य नारायण सुर्वे काव्यप्रतिभा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल प्राचार्य मलघे यांच्यावर विविध क्षेत्रातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते भारत सासणे (नारायण सुर्वे जीवनगौरव) प्रा. नेहा सावंत (पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार) डॉ. संभाजी मलघे (नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) प्रा. लीला फ. शिंदे (मास्तरांची सावली सन्मान) कमलाकर देसले (कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार) देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारप्रसंगी बोलताना डॉ. मलघे म्हणाले की, पद्मश्री नारायण सुर्वे यांची कविता कष्टकर्‍यांची कविता आहे. ही वैश्विक कविता आहे. नारायण सुर्वे यांच्या कविता प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकण्याचा योगदेखील विद्यार्थीदशेत मला मिळाला. हे माझे भाग्य आहे . आज नारायण सुर्वे यांच्या नावाने मराठी कवितेत सर्वश्रेष्ठ समजला जाणारा ‘नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार’ स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. कवी मलघे यांनी आपल्या ‘अस्वस्थ भवताल’ काव्यसंग्रहातील ‘मन की बात’ ही कविता याप्रसंगी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

समारंभाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी भरत दौंडकर, नारायण पुरी, अनंत राऊत या कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये