‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याची ममता बॅनर्जींना हात जोडून विनंती; म्हणाले, “तुम्ही आधी…”
मुंबई | The Kerala Story – सध्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पण वादाच्या भोवऱ्यात अडकूनही या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण अशातच या चित्रपटाबाबत राजकारणही पाहायला मिळत आहे. ‘द केरला स्टोरी’वर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बंदी घातली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर राज्य सरकारनं घातलेली बंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि निर्माते विपुल शाह (Vipul Shah) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक विनंती केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना विपुल शाह म्हणाले की, “हात जोडून मी ममतादीदींना सांगू इच्छितो की, तुम्ही आधी हा चित्रपट पाहा. त्यानंतर तुम्हाला चित्रपटाबाबत काही वाटलं तर आमच्याशी बोला. आम्ही त्यांचे सर्व मुद्दे ऐकून घेतो त्यानंतर आम्ही आमचे मुद्दे मांडू. ही लोकशाही आहे. माझी त्यांना विनंती असून आम्ही वाट बघू.”
तर दिग्दर्शक सुदीप्तो सेन म्हणाले, “कोणतंही राज्य सेन्सॉर बोर्डानं पास केल्यानंतर चित्रपटावर बंदी घालू शकत नाही. ही बंदी बेकायदेशीर आहे. पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की, प्रत्येकाला चित्रपट पाहण्याचा अधिकार असून तुम्हाला तो आवडो किंवा न आवडो, पण तुम्ही जबरदस्तीनं त्यावर बंदी घालू शकत नाही.”