टिपू चित्रपटाचे पोस्टर शेअर करत निर्मात्याची मोठी घोषणा; रिलीज होण्याआधीच चित्रपट वादात

मुंबई | या वर्षात मराठी असो किंवा बॉलिवूड, साऊथ इंडस्ट्री चित्रपटसृष्टीतून अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोबतच काही चित्रपट असेही होते ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाले. त्यात ऐतिहासिक कलाकृती आणि वाद हे समीकरण जुनंच आहे. काही चित्रपटांची त्यांच्या कथानकासाठी चर्चा झाली तर काहींची त्यांच्या वेषभूषेसाठी. असाच एक चित्रपट आणि त्याचा वाद सुरू झाला आहे. निर्माता संदीप सिंग यानं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. म्हैसूर साम्राज्याचा राजा टिपू सुलतान याच्या आयुष्यावर हा चित्रपट असणार आहे. निर्माता संदीप सिंग यानं आज सकाळी या चित्रपटाची घोषणा केली. त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्टर शेअर या चित्रपटाची घोषणा केलीय. हे पोस्टर शेअर करत असताना त्यानं एक कॅप्शन लिहिलं आहे. त्यावर अनेकांनी टीका केली आहे.
काय लिहिलंय संदीप सिंगनं त्याच्या पोस्टमध्ये?
टिपू सुलतानबद्दल जेव्हा वाचलं, ऐकलं तेव्हा तेव्हा धक्काच बसला. माझ्या अंगावर काटाच आला. माझा माझ्या सिनेमांवर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, स्वातंत्र्य वीर सावरकर असो, मैं अटल हूं किंवा बाल शिवाजी असो माझे चित्रपट सत्याच्या बाजूनं उभे असतात. मला वाटतं की लोकांना टिपू सुलतान कोण आणि कसा होता? हे माहीत होतं पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष करणं पसंत केलं. आणि हेच मला 70mm वर दाखवायचं आहे. आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दाखवल्याप्रमाणं तो एक धाडसी होता असं सांगून माझं ब्रेनवॉश झालं होतं. पण त्याची दुष्ट बाजू कोणालाच माहीत नाही. त्याची काळी बाजू मला भावी पिढीसमोर उलगडून दाखवायची आहे. असं संदीप सिंगनं त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
पोस्टर वादात…
दरम्यान, संदीप सिंगनं त्याच्या चित्रपटाचं पोस्ट शेअर केलं असलं तरी त्यावरून नवीन वादाला तोडं फुटलं आहे. या पोस्टरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवर चिखल फेकल्याचं दाखवण्यात आलं आहे.