देश - विदेश

मालमत्ताधारकांना विनामूल्य मिळणार ‘दुबार बिल’; सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांची माहिती

चिंचवड : पिंपरी-चिंंचवड शहरातील नागरिकांना घरपोच मालमत्ताकराची बिले पोस्ट कार्यालयामार्फत पाठविण्यात आली आहेत. काही नागरिकांना ती मिळाली नसल्याच्या तोंडी तक्रारी येत आहेत. याची करआकारणी आणि संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी तातडीने दखल घेतली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना विनामूल्य दुबार बिले पालिकेच्या १७ विभागीय कार्यालयांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पुढील आठवड्यात पोस्टाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठकीचे आयोजनही करण्यात आल्याचे सहायक आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

पिंंपरी महापालिकेच्या विभागीय कर संकलन कार्यालयाच्या वतीने दरवर्षी मालमत्ताकराची बिले घरोघरी वाटप केली जातात. मात्र, छपाई आणि वितरण व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे अनेकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बिले मिळतात. त्यामुळे नागरिक बिले भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र होते. तथापि, कर भरण्यासही विलंब होत होता. सन २०२२-२३ वर्षापासून बिले पोस्टाने घरोघरी वाटण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतला.

महापालिकेच्या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याचे आवाहन

शहरातील मालमत्ताधारकांना दरवर्षी बिले वेळेत मिळावीत, यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. यापुढील काळात महापालिकेचा एसएमएस, ई-मेलवर बिल पाठविण्याचा मानस आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर केवायसी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म मिळकतधारकाने भरावा. यामध्ये मालमत्ता क्रमांक, नाव, सविस्तर पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. जेणेकरून दरवर्षी नवीन आर्थिक वर्षांत मालमत्ताधारकांना ऑनलाईन बिले पाठविणे आणि मालमत्ताधारकांना ऑनलाईन बिल भरणे सोईस्कर होणार असल्याचे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले.

शहरात एकूण ५ लाख ७७ हजार मालमत्ताधारकांची नोंद आहे. महापालिकेने बिले छापून घेऊन ती पोस्टाला उपलब्ध करून दिली. शहरातील नागरिकांना मालमत्ताकराची बिले मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाटण्यात आली आहेत. शहरातील काही भागात अद्याप बिलच मिळाले नसल्याच्या तोंडी तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. मात्र, पोस्टाने ज्या मालमत्ताधारकांचा पत्ता सापडणार नाही, अशी बिले विभागीय कार्यालयाकडे जमा केली जातील, असे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये