शिंदे-फडणवीसांकडून मुदत संपल्यावर प्रचार, ही लोकशाहीची हत्या; रविंद्र धंगेकर कडाडले…
Pune Bypoll election : काल कसब्याच्या प्रचाराची मुदत संपली तरी शिंदे-फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार केला. ही लोकशाहीची हत्या आहे, असा हल्लाबोल महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप-शिंदे गटावर केला आहे. कसबा मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा थेट आरोप देखील धंगेकर यांनी केला आहे. ते पत्नीसोबत पुण्याच्या कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
धंगेकर म्हणाले की, भाजप नेते पोलिसांच्या उपस्थितीत प्रचार करत आहेत. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या आहे. या सगळ्या प्रकारात निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेत असून, त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही. पोलीस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत. गुन्हेगार आणि पोलीसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप होत असेल तर ही गंभीर बाब आहे. भाजप कायम यंत्रणेचा वापर करुन घेत असते, असा आरोप भाजपवर कायम होत असतो. आता निवडणुकीसाठी ही पैसे वाटप करत आहेत असं असेल तर हा विषय सगळ्यांनी गंभीरपणे घ्यायला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.