ताज्या बातम्यापुणेरणधुमाळीसिटी अपडेट्स

पालकमंत्र्यांच्या हाती उरलंय काय? जिल्हा प्रशासनासह राज्य प्रशासनात वाढतोय गोंधळ

पुणे | Pune News – राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारच्या काळात पुणे (Pune) जिल्ह्याच्या प्रशासनात गोंधळच अधिक वाढत जाणार आहे. जिल्हा प्रशासनावर लक्ष ठेवून शासकीय धोरणे राबवून घेण्यासाठी पालकमंत्री असे पद निर्माण करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती, कालवा समिती अशा शासकीय बैठका पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील पालकमंत्र्यांची असते. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारे हे पद सध्या तरी भाजपचे नेते, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. राज्यातील अत्यंत महत्त्वाचे महसूल खाते यापूर्वी पाटील यांनी सांभाळले. त्यामुळे प्रशासन, त्यातील गुंतागुंत त्यांना चांगली माहिती आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असणाऱ्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद सांभाळताना भाजपचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे, असे जिकीरीचे काम पाटील यांच्यावर सोपविण्यात आले आहे. पण, पाटील यांच्या हाती उरलंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशभर गाजणारा सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात होतो. गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रात्री १० वाजल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदुषण होईल, असे (गायन, वादन, रेकॉर्डस् लावणे आदी) काही करता येत नाही. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांनाही काही सवलती दिल्या. त्या सवलतीच्या आधारे गणेशोत्सव काळात काही दिवस रात्री १२ वाजेपर्यंत रेकॉर्ड लावण्यास परवानगी देण्यात येते. यंदाच्या उत्सवात कोणत्या तारखांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली. त्याची घोषणा विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.

एवढेच नव्हे, तर नीलम गोऱ्हे यांनी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकाही घेतल्या. गणेशोत्सव मंडळाच्या बैठका साधारणपणे शहराच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली होतात. सध्या महापालिका अस्तित्वात नसल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठका घेणे अपेक्षित होते. पुण्यात जयंतराव टिळक विधानपरिषदेचे सभापती होते. पण, त्यांनी सभापती या नात्याने कधी अशा बैठका घेतल्या नव्हत्या. दुसरीकडे पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलमताईंच्या पुढे एक पाऊल टाकले.

गणेशोत्सव काळात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शहरातील मेट्रोच्या वेळा कोणत्या असतील ते जाहीर केले. जिल्ह्यातील कामांबाबत अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. पालकमंत्र्यांच्या ही वेगळ्या बैठका होत असतात. हे वातावरण गोंधळात टाकणारे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या ऊर्जा खाते आहे. तरीही त्या विभागातील बैठकही नुकतेच अजित पवारांनी घेतले. महावितरणा संदर्भातील काही प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी ही बैठक घेतली. त्यामुळे अजितदादांची थेट देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी पाहायला मिळत आहे.

पद धोक्यात?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांकडून अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी सतत होत असते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाले, तेव्हापासूनच पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद किती काळ राहील, याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये