“प्रशासनाने सर्वसामान्यांची दिशाभूल करू नये”; दीपाली धुमाळ
!["प्रशासनाने सर्वसामान्यांची दिशाभूल करू नये"; दीपाली धुमाळ dipali dhual](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/dipali-dhual-780x470.jpg)
राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : एल अँड टी कंपनीकडून करण्यात आलेली अर्धवट कामे, मीटर बसवताना करण्यात आलेली तोडफोड व नागरिकांना देण्यात आलेली चुकीची माहिती व आता अचानक पाणी वापराबाबत दिलेल्या नोटिशीत देण्यात आलेला कारवाईचा इशारा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने अशा चुकीच्या नोटिसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिला आहे.
नोटीस दिलेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधी नंतर पाणीपुरवठा विभागद्वारे कारवाई करण्यात येईल. केवळ नोटिसा देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळी अधिकाऱ्यांद्वारे असे सांगण्यात आले की, या नोटिसा फक्त नागरिकांमध्ये पाण्याच्या नियमित वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दिल्या जात आहेत. परंतु लोकांना नोटिसा देऊन घाबरवणे हा कोणता जनजागृतीचा प्रकार आहे, असा प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
धुमाळ म्हणाल्या, शहरात पाणीपुरवठा विभाग मार्फत नागरिकांसाठी समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत एलएनटी कंपनी मार्फत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या व पाईप लाईनचे काम सुरु आहे. मध्यंतरी प्रशासन व एलएनटी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन नळ कनेक्शनला पाण्याचे मीटर बसविले होते.
सदर मीटर बसवताना झालेले तोडफोड, लिकेज व नुकसान तसेच काम अपूर्ण सोडून मीटर बसविण्यात आले. त्यावेळी नागरिकांना सांगण्यात आले. हे मीटर लवकर सुरु होणार नाही व याचे कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा बिल येणार नाही, अशी नागरिकांची खोटी समजूत काढण्यात आली.
नोटिसा देऊन नागरिकांमध्ये भीती दायक वातावरण निर्माण करण्याऐवजी याबाबत, जाहिरात, पत्रके या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र नागरिकांना भीती दाखवून प्रशासनाला कसला आनंद मिळतो ? पालिका आयुक्तांनी या प्रकारात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. अशा प्रकारच्या नोटिसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटिसा देणे थांबवा.
– दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या
परंतु, आता पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना नोटिसा येऊ लागल्या आहेत. या नोटिशीत कोणत्याही प्रकारची मीटर रिडिंग न घेता किंवा त्या ठिकाणी न जाता सदर कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा खरच पाण्याचा वापर तेवढ्या प्रमाणात होत आहे का अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजे आकडे टाकून नोटिसा दिल्या आहेत. सदर कुटुंबात २ व्यक्ती असेल तर त्या कुटुंबात ५ ते ६ व्यक्ती आहेत, अशी खोटी आकडेवारी देऊन नोटिसा दिल्या आहेत.