
खेड : पुणे नाशिक महामार्गाचे (Pune-Nashik Highway) बाह्यवळण वगळून खेड घाट माथा ते सिन्नर असे काँक्रीटीकरण (concreting-roads) काम सुरू आहे. खेड घाट माथा ते सिन्नर असे पुण्याकडून ४२ ते १७९ किलोमिटर पर्यंत एकुण १३८ किलोमिटर पर्यंत काम होणार आहे. पूर्वीचे डांबरीकरण अनेक भागात खराब झाले, खड्डे पडले. त्याची वारंवार दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाला वेळोवळी तरतुद करावी लागत होती. वार्षिक दुरुस्ती खर्च मोठा होता. कायमस्वरुपी मजबुतीकरण करण्याच्या हेतुने केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नवीन तंत्रज्ञान असलेले सिमेंट काँक्रिट (concert) करण्यात येत आहे. त्याकरिता ४३०.६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६ अखेर या कामाची मुदत आहे. नियोजित अंतरावरील सर्व बाह्यवळण वगळून काँक्रिट चे काम करण्यात येणार आहे. तसेच खेड तालुक्यातील पेठ (ता. आंबेगाव) ते जैदवाडी (ता. खेड) आकाश हॉटेल (Hotel Aakash) सर्व्हिस रोड या कामाचा समावेश करण्यात आला आहे.
सध्या खेड आणि आंबेगाव तालुक्यातील सांडभोरवाडी, पेठ हद्दीत हे काम काही भागात पुर्ण झाले आहे. काही ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. थिन व्हाईट टॉपिंग (thin-whitetopping) नवीन तंत्रज्ञानाद्वारे एम ३५ ग्रेड काँक्रिट करण्यात येत आहे. बहुतांशी काम यांत्रिक पद्धतीने केले जात असून, चाकण (Chakan) येथील शंकर अर्थमुव्हर्स प्रा. लि. या ठेकेदार कंपनी मार्फत कोट्यवधी रुपयांची ऑटोमॅटिक मशिनरी त्यासाठी वापरण्यात येत आहे. प्रस्तावित निविदेनुसार या रस्त्याचे सिमेंट काँक्रिट काम १८० मिलिमीटर जाडीचे होणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी मोजमाप घेतले असता प्रत्यक्षात ते १२० ते १४० मिलिमीटर जाडीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय काँक्रिट करण्यासाठी पूर्वीचा डांबरी रस्ता खोदकाम करण्यात येत आहे. त्याचा राडारोडा साईड पट्ट्या भरावाला वापरण्यात येत आहे. असा भराव भविष्यात दबून जाण्याची शक्यता आहे. काम एका लेनला होत असताना त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला एकाच लेन वरुन नेहमीची दुहेरी वाहतूक सुरू आहे. जे अत्यंत धोकादायक असुन, गेल्या काही दिवसांत जीवघेणे अपघात झाले आहेत. शिवाय मोठी वाहतूक कोंडी देखील होते.