राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

राज एक पाऊल पुढे…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी आहे असा प्रचार विरोधक करीत आहेत. ते तसे असेल किंवा नसेल, मात्र राज ठाकरे या दोन प्रादेशिक पक्षांची जागा, प्रादेशिक पक्षांच्या सत्तासंघर्षात बळकावण्याचा प्रयत्न निर्धाराने करीत आहेत हे नक्की आहे.

हा अग्रलेख लिहीत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होणार अशा बातम्या सांगितल्या जात होत्या. साहजिकच या अटकेनंतर काय, असा प्रश्न प्रतिक्रिया म्हणून उमटू लागला आहे. ईद असल्यामुळे दोन दिवस राज ठाकरे यांना अटकेपासून किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामध्ये सूट मिळाली होती. खरेतर औरंगाबाद येथे संध्याकाळी भाषण झाल्यावर त्यांच्यावर रात्रीच गुन्हा दाखल होईल असे वाटत होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा डिवचले होते, तर सध्याच्या महाआघाडी सरकारला त्रासदायक होईल अशी मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्ये केली होती. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल आणि या दोन्ही धर्मातील तरुणांची डोकी फिरतील अशी वक्तव्ये राज ठाकरे यांनी केली, असे पोलिस सहज सिद्ध करू शकतात आणि त्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल होणे आणि त्यांना अटक करणे हे आज ना उद्या होणार होतेच, पण वर म्हटल्याप्रमाणे राज ठाकरे यांना दोन दिवसांचा अवधी मिळाला हे महत्त्वाचे. मुळात राज ठाकरे मनसेच्या स्थापनेपासून जे मुद्दे उपस्थित करीत आहेत ते मुद्दे ते शिवसेनेत असताना उपस्थित केले जात होते.

राज ठाकरे ते मुद्दे घेऊन शिवसेनेची युवासेना चालवत होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, हिंदुत्व, भोंगे, अजान, मुस्लिम समाज या अनुषंगाने काँग्रेस पक्षावर अनेकदा टीका केली होती. हेच मुद्दे आता राज ठाकरे आपल्या पक्षवाढीसाठी उपस्थित करीत आहेत. साहजिकच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे नवीन काही सांगत नसून, शिवसेना ज्या मुद्यांवर काम करीत होती ते मुद्दे आपले असल्याचे सांगत राज ठाकरे राजकारण करीत असल्याचे म्हणत आहेत. संजय राऊत हा विषय चर्चा करण्यासारखा नाही. पक्षाचा प्रवक्ता होण्यासाठी केवळ वाचाळपणा आणि असंबद्ध बडबड करण्याची क्षमता ज्याच्याकडे असेल तो पक्ष प्रवक्ता होऊ शकतो हे राऊत यांनी स्वप्रमाण दाखवून दिले आहे. त्यामुळे राऊत काय म्हणतात यापेक्षा उद्धव ठाकरे शरद पवारांनी सांगितलेले काय बोलतात याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सोमय्या मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. या घोटाळ्यांबाबत उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून बोलणार आहेत का, बोलणार असतील तर, ते स्वप्रमाण पुराव्यासह बोलणार आहेत का? कारण उद्धव ठाकरे यांची दोन्ही भूमिकांतील भाषणे ही ना टोकदार असतात ना धारदार. भाषणात केवळ खंजीर, तलवार, कोथळा हे शब्द वापरल्याने भाषण तसे होत नाही, हे आता श्रोत्यांनाही समजले आहे.

मूळ मुद्दा आहे तो राज ठाकरे यांनी शिवसेनेचे मुद्दे उचलले आहेत का आणि त्याचे परिणाम काय होईल. परिणाम स्पष्ट आहे शिवसेनेचीच विचार आणि कृती अमलात आणणारे मनसेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राडा संस्कृती आणि खळ्खट्याक आवाज यावर राज्य सरकारला नियंत्रण ठेवणं हे मोठे उद्दिष्ट असेल. शिवसेना आपल्या भूमिका बदलत राहिली, त्यामुळे त्यांचे हे मुद्दे इतर पक्ष हाताळू लागलेत आणि ते त्यांनी त्यांचे मुद्दे म्हणून सांगायला सुरुवात केली. मराठीचा मुद्दा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अडचणीचा होऊ लागल्यावर त्यांनी त्याचा विस्तार करीत तो हिंदुत्वाचा मुद्दा केला. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर त्याचा फायदा त्यांनी करून घेतला. मात्र हा फायदा त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा दबदबा वाढविण्यासाठी केला नाही, तर बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचा दबदबा वाढविण्यासाठी केला आणि त्यात ते यशस्वी ठरले.

राज ठाकरे आज त्याच मार्गाने जात आहेत. औरंगाबाद येथील भाषणात त्यांनी हनुमान चालिसा देशभरात म्हणण्याचे आवाहन करीत राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ठाकरे बंधूंच्या सत्ताकांक्षेच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी या सभेमुळे मागे टाकले आहे. मुळात उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय राजकारणात अशा पद्धतीने पाऊल टाकणे शरद पवार यांच्या महत्त्वाकांक्षेमुळेच सहज शक्य होणार नाही. तर काँग्रेस ही कर्जबाजारी जमीनदारांची जुनाट हवेली असली तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रादेशिक पक्षांचा दुय्यम दर्जा देत असल्यामुळे यूपीएमध्ये राष्ट्रीय राजकारणात तोंडी त्यांना घेईल यात काही शंका नाही. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा आणि त्यानंतरही त्यांच्या होणार्‍या सभा या राजकारणाला वेगवेगळी वळणे देणार्‍या असतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये