“राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू…”, राज ठाकरेंचं टीकास्त्र

रत्नागिरी | Raj Thackeray – आज (3 डिसेंबर) मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची टीका केली. “राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. पण माझा महाराष्ट्र सैनिक हालत नाही याचा मला अभिमान आहे. अनेकांना पैशाचं अमिष दाखवलं जात आहे. पण तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रुपांतर होतील”, असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. आज राज ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरेंनी जानेवारीत पुन्हा कोकणचा दौरा करणार असल्याचं सांगितलं. महापालिकांच्या निवडणुका गेल्या दोन अडीच वर्षापासून ठप्प झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजेच 2023 मार्च, एप्रिलमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचंही ठाकरे म्हणाले. त्यावेळी मी पुन्हा कोकणात येणार आहे. मी केलेल्या सुचनांची अंमलबाजवणी योग्य होते की नाही हे पाहायला मी येणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आपलं दर्शन होईल. मला जे काही मांडायचं आहे ते मी मांडेन. कोकणासंदर्भात, महाराष्ट्राबाबत तसंच मराठी माणूस आणि हिंदुत्वासंदर्भात माझं म्हणणं मांडेन, असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. 1 डिसेंबरपासून त्यांचा कोकण दौरा सुरु झाला आहे. त्यांनी सिंधुदुर्गातून दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक देखील त्यांनी घेतली. तसंच राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित आहेत.