नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यावर राम कदमांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : नवनीत राणा यांना प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून त्यांनीदेखील याची दखल घेत २४ तासात सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्वीट करत आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. यावर आता भाजपा आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
यावेळी राम कदम म्हणाले, “या व्हिडीओबाबतची विशेष स्पष्टता स्वतः खासदार नवनीत राणाच देऊ शकतील. मात्र, दोन गोष्टी नाकारता येणार नाहीत. मुंबई पोलीस तीन पक्षांच्या सरकारच्या दबावात करत आहे. हे आपल्याला नाकारता येणार आहे का? मागच्या अडीच वर्षापासून मुंबईत मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांवर अत्याचाराचं सत्र सुरू आहे. मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये घेतले जात आहेत.”
“मंत्र्यांना कोट्यावधी रुपये देण्यासाठी खाली पोलीस ठाण्यांमध्ये हैदोस मांडला गेलाय तो आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे चहा पितानाचं एक दृश्य या व्हिडीओत आलं असलं तरी त्या स्वतः खासदार आहेत. त्या म्हणतात मला पाणी नाकारलं. त्यामुळे आधी पाणी नाकारलं, नंतर वाद केल्यावर शांत करण्यासाठी चहा दिला का? या दोन्ही गोष्टी येतात,” असंही राम कदम म्हणाले.
पुढे राम कदम म्हणाले, “खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा स्वतः म्हणत असतील की आम्हाला पाणी देखील नाकारलं, तर आपल्याला ती गोष्ट नाकारून चालणार नाही. वादानंतर ते खासदार आहेत, आमदार आहेत हे पोलिसांच्या लक्षात आलं असेल, पुढे जाऊन प्रकरण आपल्या डोईशी येईल असं वाटल्याने पोलिसांनी समजूत घालण्यासाठी राणांना चहा दिला असेल. साधारणपणे असंच होतं.”