आपल्या क्षमतांचा अंदाज, आणि परिस्थिती पचविण्याची मन मेंदू व मनगटात ताकद पाहिजे अन्यथा असह्य ताणतणावात माणूस कोसळतो, मोडून पडतो हे वास्तव पुन्हा पुन्हा समोर येते.
प्रख्यात नेपथ्यकार, निर्माते नितीन देसाई यांनी आपणच उभ्या केलेल्या स्टुडिओत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळत नकळत तो स्टुडिओच आहे. त्यासाठी नितीन देसाई यांनी रक्ताचे पाणी केले होते. गेल्या आठवड्यात कोटा येथे विद्यार्थ्यांनी ताण असह्य होऊन आत्महत्या केल्याचे प्रकरणही वृत्तपत्रांमध्ये गाजले. एकूणच मन दुभंगले की माणूस मोडतो हाच अनुभव शिकणाऱ्या मुलांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत येत असतो.
ज्या जागेत नितीन देसाई यांच्या पार्थिवाची राख विखुरली आहे तिथे जे घडले ते अत्यंत क्लेशदायक आहे. एका हरहुन्नरी, सर्जनशील कलावंताची अशी अखेर होणे नक्कीच मनाला चटका लावून जाणारे आहे. नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर त्याची कारण मीमांसा होणार. अशा वेळी नातेसंबंध, आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक संबंधातील पीळ-पेच, त्या व्यक्तीची मानसिकता अशा विविध पैलूंवर आपापल्या परीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
कलाकार समाजातून जाण्याचे दुःख आणि हानी न भरून येणारी असते. मात्र त्याला अखेरीस ‘मराठी माणूस’, ‘स्थानिकांवर अत्याचार, अन्याय’ किंवा ‘प्रांतीय- परप्रांतीय’ अशी राजकारणाने प्रेरित होऊन बोलली जाणारी भाषा करणे योग्य होणार नाही. व्यक्ती गेल्याचे दुःख, त्यातून कलाकार आपल्यातून गेल्याची वेदना सहन न होणारीच आहे . दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीने कर्ज फेडीच्या प्रकरणाचे मांडलेले वास्तव जरी मान्य केले तरी कायद्याच्या कसावर ते कितपत टिकेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
या सगळ्याचा विचार केला तर नितीन देसाई यांनी कर्ज घेताना, आपण ज्यांच्याकडून कर्ज घेतो ते मराठी की अमराठी आहेत याची कल्पना नक्कीच होती. पैसेच कर्जांनी घ्यायचे होते तर मराठी सावकारांकडून का घेतले नाही, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. इथे सावकार याचा अर्थ, अर्थात पैसे पुरवठा करणाऱ्या व्यक्ती वा संस्था असाच आहे. जेव्हा शंभर कोटी रुपयांचे कर्ज व्यवहार होतात, तेव्हा ते वेळेत न फेडण्यामुळे काय होईल याची रास्त कल्पना तसेच जाणीव ही कर्ज घेणाऱ्याला असते. ती जाणीव त्याला स्पष्टपणे दिलीही जाते.
यात सत्य एकच आहे, व्यवसायाचे गणित आपण चुकलो तर त्या चुकीच्या जबाबदारीस आपणच कारणीभूत ठरतो. ज्याच्याकडून पैसे कर्जाऊ घेतले तोही कुणाकडून तरी पैसे घेऊन देतो. म्हणजेच तोही कोणाला तरी देणे लागत असतोच. सबब जिथे व्यवहार आहे तिथे भावनेने तो व्यवहार संपवण्याचा प्रकार घडत नाही. कदाचित कर्जांच्या हप्त्याची मुदत मागेपुढे होईल. मात्र अंतिमतः कर्ज फेडावेच लागेल, हे अंतिम सत्य मान्य करावेच लागते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे तंत्रज्ञान बदलत आहे. आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे मोठे स्टुडिओ, त्याची प्रॉपर्टी यांची आवश्यकता कमी झाली आहे. नितीन देसाई यांच्याकडे नव्या तंत्रज्ञानामुळे काम नव्हते, अशीही चर्चा आहे. अशा वेळी स्टुडिओ उभारणे, त्याची देखभाल, दुरुस्ती करणे हे मोठे खर्चिक काम आहे. त्यातूनही अर्थकारणाची घडी सातत्याने बदलत असते. त्यात तंत्रज्ञान तर त्याहूनही झपाट्याने बदलते. बदलते तंत्रज्ञान याला कारणीभूत आहे. बैलगाडीच्या चाकांच्या धावा करणारे रबरी टायर आल्यावर बेरोजगार झाले तर ट्यूबलेस टायरमुळे पंक्चर काढणारे बेरोजगार होऊ शकतील. हे झाले तंत्रज्ञानात बदलाचे सामान्य उदाहरण.
मात्र मोठ्या गुंतवणुकीची उदाहरणे मोठी असतात. मानवी शक्ती, वेळ, पैशाची गुंतवणूक आणि अफाट वेगाने अंदाज न येणारे तंत्रज्ञान याच्या चक्रात टिकून राहणे हे मानवी कौशल्यावर आधारित आहे. तिथे किंचित चूक झाली तरी हाती वैफल्य येऊ शकते किंवा मनाला चटका लावणाऱ्या घटना घडतात. अर्थकारणाची मोजपट्टी तुलनेने लहान असेल तर त्याची मोठी चर्चा होत नाही. मात्र करोडो रुपयांवर ही मोजपट्टी गेली की त्याची बातमी आणि चर्चा ही होणारच.
त्यातून चित्रपट क्षेत्र तर दर शुक्रवारी कोणाचे ना कोणाचे नशीब बदलवणारे क्षेत्र आहे. प्रचंड अस्थिरता, गळेकापू स्पर्धा, नीती- अनितीने भरलेल्या अशा वातावरणात सर्जनशीलता टिकवणे हे शिवधनुष्य आहे. ते पेलण्यासाठी रोकडा, चोख व्यवहार, आपल्या क्षमतांचा अंदाज आणि परिस्थिती पचविण्याची मन, मेंदू व मनगटात ताकद पाहिजे अन्यथा असह्य ताणतणावात माणूस कोसळतो, मोडून पडतो हे वास्तव पुन्हा पुन्हा समोर येते.