मोहन भागवतांचा सल्ला मुखपत्राकडूनच धाब्यावर

पुणेः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मंदिर-मशिदीचा वाद उकरून न काढण्याचा सल्ला दिला असताना संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’कडून मात्र संभलच्या वादावरच कव्हर स्टोरी केली आहे. संभल येथील मशिदीच्या जागी मंदिर होते, असा दावा लेखात करण्यात आला आहे. भागवत यांच्या मताच्याविरोधी मत व्यक्त करून अन्य हिंदू नेते आणि मुस्लिमांच्या हातात आयते कोलित दिले आहे.
भागवत यांनी मंदिर-मशीद वादावर दिलेल्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद-विवाद (Political War) सुरू आहे. संघप्रमुखांच्या वक्तव्यावर अनेक हिंदू धर्मगुरूंनी नाराजी व्यक्त केली आहे, तर उर्दू वृत्तपत्रांनी नुसते विचार करण्याऐवजी संघप्रमुखांनी संघ स्वयंसेवकांना लगाम घालावा, असे लिहिले आहे. या सगळ्यामध्ये संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ने या प्रकरणावर एक कव्हर स्टोरीही प्रकाशित केली असून संपादकीयही लिहिले आहे. संभलची शाही जामा मशीद ते अजमेर शरीफ दर्गा आणि अशा अनेक प्रकरणांबाबत भागवत म्हणाले होते, की असे मुद्दे रोज उपस्थित करणे मान्य करता येणार नाही. अयोध्येत राम मंदिर बांधल्यापासून काही लोकांचा असा विश्वास वाटू लागला आहे, की असे मुद्दे उपस्थित करून ते ‘हिंदूंचे नेते’ होऊ शकतात.
भागवत यांनी गेल्या गुरुवारी पुण्यातील हिंदू सेवा महोत्सवात हे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी अमरावतीत बोलतानाही ‘सर्वसमावेशक समाज’ चा पुरस्कार केला. धर्माचे अज्ञान हेच कलहाचे कारण ठरते, असे त्यांनी महानुभव आश्रमाच्या कार्यक्रमात सांगितले होते. धर्म नीट समजून न घेता दुसऱ्या धर्मावर आघात करणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या विधानांचे अजमेर दर्ग्याच्या जैनुल यांच्यासह अन्य मुस्लिम धर्मगुरूंनी स्वागत केले होते; परंतु शंकराचार्यासह अन्य हिंदू धर्मनेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भागवत यांचे वक्तव्य मुस्लिमांना हवेहवेसे, तर हिंदूंना नकोसे झाले आहे. काहींनी तर भागवत संघाचे प्रमुख आहेत, हिंदू धर्माचे नाहीत, असा पवित्रआ घेतला. भागवत हे हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. त्यांचे आम्ही का ऐकावे, असा सवाल जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी केला होता.
संबंधित असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाच्या ताज्या संपादकीयात म्हटले आहे, की वादग्रस्त स्थळे आणि जुन्या वास्तूंचा खरा इतिहास जाणून घेणे ‘सभ्यतेच्या न्यायासाठी’ खूप महत्त्वाचे आहे. संभलच्या जामा मशीद वाद प्रकरणाची कव्हर स्टोरी मासिकात प्रसिद्ध झाली आहे. या कव्हर स्टोरीचा दावा आहे, की संभलमधील शाही जामा मशिदीच्या जागेवर एक मंदिर अस्तित्वात होते. गेल्या काही वर्षांत संभलमध्ये घडलेल्या जातीय घटनांचाही त्यात उल्लेख आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुखपृष्ठ आणि संपादकीयमध्ये मंदिर-मशीद वादाच्या संदर्भात संघप्रमुखांचा सल्ला किंवा इशारा पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आला आहे. ज्या धार्मिक स्थळांवर हल्ले झाले आहेत किंवा पाडण्यात आले आहेत अशा प्रकरणांमध्ये ‘सत्य शोधले पाहिजे’ असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
मासिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी लिहिलेल्या संपादकीयात म्हटले आहे, की सभ्यतेच्या न्यायाच्या शोधाबद्दल बोलण्याची वेळ आली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीनिहाय भेदभावाचे खरे कारण समजून ते संपवण्यासाठी काही घटनात्मक उपाय आपल्यासमोर मांडले. “धार्मिक संघर्ष संपवण्यासाठी आम्हाला समान दृष्टिकोन हवा आहे.” मुस्लिम समाजाने सत्य स्वीकारले तरच हे शक्य आहे आणि समाजाने ते नाकारले तर ते अलिप्ततावादाला कारणीभूत ठरेल, असा युक्तिवाद संपादकीयात करण्यात आला आहे. मुस्लिम धार्मिक स्थळांवर हिंदूंच्या हक्काची मागणी करणारे दाखल करण्यात आलेले खटले आणि देशाच्या विविध भागात अशा प्रकरणांची वाढती संख्या यामुळे संघ परिवार अस्वस्थ आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद किंवा मथुरा ईदगाहवरील हिंदू समाजाचे हक्क आणि दावे अशा प्रकारच्या विपुलतेमुळे कमकुवत होतील, असे संघाच्या नेत्यांना वाटते, असे या बातमीत म्हटले आहे. या प्रकरणांवर संघ परिवाराच्या मौनावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, तर या प्रकरणांशी संबंधित याचिकांना त्यांच्या स्वयंसेवकांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.
‘ऑर्गनायझर’ची मुखपृष्ठ कथा आणि संपादकीयात असे म्हटले आहे, की भारतातील मुस्लिम समाजाने आक्रमकांनी हिंदूंवर केलेला ‘ऐतिहासिक अन्याय’ स्वीकारणे महत्त्वाचे आहे. सोमनाथ ते संभल आणि त्यापुढील सत्य जाणून घेण्यासाठीचा हा लढा धार्मिक श्रेष्ठतेचा नाही, असे संयोजकाने संपादकीयात म्हटले आहे. हे आपली राष्ट्रीय अस्मिता आणि ‘सभ्यता न्याय’ सिद्ध करण्याविषयी आहे. मासिकात लिहिलेल्या लेखात “ऐतिहासिक जखमा भरून काढण्याबद्दल” देखील सांगितले आहे.