देश - विदेश

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग

नवी दिल्ली | लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने दिल्लीतील सर्व म्हणजे सातही लोकसभा जागांसाठीच्या प्रभारींची (समन्वय प्रमुख) नावे जाहीर केली. आगामी लोकसभेत भाजप नेतृत्व दिल्लीतील सध्याचे किमान तीन ते चार खासदार बदलण्याचीही चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वेसर्वा असलेला दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यातील वादावादीचा अध्याय ताजा असतानाच भाजपने लोकसभा प्रभारी निश्चित करून बूथपातळीवरील तयारीला वेग दिला आहे.

प्रत्यक्ष तिकीट वाटपात केजरीवाल काँग्रेससाठी किती जागा सोडतील व काँगेसचे स्थानिक नेते त्यांच्याशी युतीला विरोध करण्यासाठी किती आक्रमक होतील याची झलक नुकतीच दिसल्याने भाजपच्या आशा आणखी पल्लवित झाल्या आहेत.
इतर महानगरांप्रमाणेच दिल्लीचा मतदारही लोकसभेसाठी विधानसभेपेक्षा भिन्न मतदान करतो, हा गेल्या ३० वर्षांतील कल आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सातही जागा २०२४ मध्ये राखण्यासाठी भाजप यापुढे आणखी वेगवान पावले उचलणार हेही स्पष्ट आहे. भाजपने ज्या नेत्यांवर लोकसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांच्याकडे संघटना विस्तार आणि संघटना मजबूत करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रदेश उपाध्यक्ष दिनेश प्रताप सिंह यांना भाजपने नवी दिल्ली लोकसभेचे प्रभारी बनवले आहे. ही जागा केजरीवाल यांच्या वर्चस्वाखालील मानली जाते. पक्षाचे महासचिव हर्ष मल्होत्रा यांच्याकडे पूर्व दिल्ली लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय योगेंद्र चंदौलिया-वायव्य दिल्ली, कमलजीत सेहरावत- ईशान्य, राजेश भाटिया- चांदनी चौक, राजीव बब्बर-दक्षिण आणि जयप्रकाश-पश्चिम दिल्लीचे प्रभारी असतील. माजी प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या जवळच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली आहे. विक्रम बिधुडी यांना दिल्ली भाजप युवा मोर्चाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. महिला मोर्चाच्या लता गुप्ता, अनुसूचित जाती मोर्चात करमसिंग कर्मा, ओबीसी मोर्चात जेपी तोमर, अल्पसंख्याक मोर्चात मोहम्मद हारुन युसूफ, पूर्वांचल मोर्चात विजय भगत, अनुसूचित जाती मोर्चात माजी महापौर सुनीता कांगरा यांनाही जबाबदाऱ्या नव्याने दिलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये